असं झालं खडसेंचं मनोमिलन, जळगाव जिल्हा परिषदेची जागा भाजपने राखली
सध्या पक्षात नाराज असलेल्या एकनाथ खडसेंची मनधरणी करण्यात भाजप नेतृत्वाला यश आलंय.
योगेश खरे, झी मीडिया, जळगाव : सध्या पक्षात नाराज असलेल्या एकनाथ खडसेंची मनधरणी करण्यात भाजप नेतृत्वाला यश आलंय. त्यामुळंच जळगाव जिल्हा परिषदेतली सत्ता भाजपनं कायम राखलीय. आधी मंत्रीपदावरून उचलबांगडी केल्यानं आणि नंतर विधानसभा निवडणुकीत तिकीट कापल्यानं एकनाथ खडसे भाजप नेतृत्वावर नाराज होते. त्यातच कन्या रोहिणी खडसे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानं त्यांचा संताप आणखीच वाढला. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावरच त्यांनी खापर फोडलं.
जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडसेंची नाराजी भाजपला भोवली असती. त्यामुळे रातोरात चक्रं फिरली. आधी गिरीश महाजन यांनी जळगाव शहर भाजप कार्यालयात खडसेंसोबत बैठक घेतली. त्यानंतर खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी स्वतः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावला पोहोचले. जैन हिल्स इथं खडसेंनी फडणवीसांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.
खडसे, फडणवीस आणि महाजन यांनी एका टेबलावर बसून ब्रेकफास्ट केला. या मनोमिलनामुळंच जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या रंजना प्रल्हाद पाटील अध्यक्षा, तर लालचंद पाटील उपाध्यक्षपदी विजयी झाले.
आता हे मनोमिलन केवळ जिल्हा परिषद निवडणुकीपुरतं आहे की, खडसेंच्या मनातली भाजप नेतृत्वाबद्दलची सगळी खदखद आता मागे पडणाराय, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.