दोन चिमुकल्यांचे मृतदेह विहिरीवर तरंगत होते, हत्येचं कारण ऐकून जळगाव हादरलं
चुलत भावाने दोन चिमुकल्या भावांना विहिरीत ढकललं...कारण होतं...
वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : जळगावमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यात एका तरुणाने आपल्या दोन चिमुकल्या चुलत भावांची हत्या केली. हत्येचं कारण ऐकूण सर्वांनाच धक्का बसला आहे. आरोपी तरुणाने दोन चिमुकल्यांना विहिरत ढकलून त्यांचा जीव घेतला.
नेमकं प्रकरण काय?
यावल तालुक्यातील रवींद्र आणि उज्ज्वला सावळे हे दाम्पत्य चुंचाळे शेतशिवाराजवळ राहणार आहे. त्यांना 6 वर्षांचा रितेश आणि 5 वर्षांचा हितेश अशी मुलं आहेत. बुधवारी सावळे दाम्पत्य शेतात काम करत होते, यावेळी त्यांच्याबरोबर नीलेश सावळे हा त्यांचा पुतण्याही होता. काम आटोपल्यानंतर उज्ज्वला सावळेने आपल्या दोन्ही मुलांना जेवण्यासाठा आवाज दिला. पण त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. मुलांचा शोध घेतला असता दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. हे दृष्य पाहून मुलांच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला.
चिमुकल्यांच्या खुनाचं कारण
पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत उपस्थितांची चौकशी केली. यावेळी या मुलांचा चुलत भाऊ निलेश सावळेच्या जबाबात तफावत आढळली, पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता, निलेशने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. जेवणात एकच चपाती दिल्याच्या रागातून आपण हा गुन्हा केल्याचं आरोपीनं कबुल केलं.
वडिलोपार्जीत शेतीचं उत्पन्न दाखवलं जात नाही, नोकरासारखी वागणूक मिळते, जेवणात एकच पोळी दिली, इतर सर्व पोटभर जेवले, पुन्हा दुपारी दोघा पोरांना जेऊ घातलं मला विचारलेदेखील नाही, याचा राग मनात होता. मी शेतातील विहिरीवर बसलो होतो. तेव्हा दोन्ही पोरं विहिरीत दगड टाकत होते. मी त्यांना हटकले तेव्हा त्यांनी मला दगड मारला त्यामुळे संतापात दोघांना विहिरीत टाकले, अशी कबुली आरोपी नीलेश सावळे याने पोलिसांना दिली आहे.