नितेश महाजन, झी मीडिया, जालना : सध्या लहान मुलांमध्ये मोबाईलचा वाढता वापर हा पालकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अनेक लहान मुलांना मोबाईल वापरण्याचं अक्षरक्षः व्यसन लागल्याचे पाहायला मिळतंय. अशातच जालन्यात मोबाईलच्या भीषण दुर्घटनेत एका पाच वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जालन्यात मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन पाच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कुंभारी वाडी भागात ही घटना घडलीय. समर्थ तायडे असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकाचं नाव आहे. चिमुकल्या समर्थच्या मृत्यूने तायडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या आमठाणा येथील तायडे कुटुंब हे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कुंभारी वाडी गावात आलं होतं. यावेळी मुलांसोबत खेळताना पाच वर्षाच्या समर्थने मोबाईलची खराब बॅटरी कानाला लावली. त्याच क्षणी मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन समर्थच्या कानाला आणि हाताला गंभीर जखमा झाल्या. स्फोटाचा आवाज ऐकून घरातल्या सर्वांनी त्याच्याजवळ धाव घेतली. त्यावेळी सर्मथ जखमी अवस्थेत आढळून आला. त्यामुळे तायडे कुटुंबियांनी तात्काळ समर्थला भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. सर्मथच्या मृत्यूची बातमी कळताच तायडे कुटुंबियांना जबर धक्का बसला असून कुंभार वाडी गावावर शोककळा पसरली आहे.


सोमवारी सकाळी हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. समर्थ परशुराम तायडे हा कुटुंबियांसह भोकरदन शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जालना रोडवरील कुंभारी वाडी गावात मामाच्या घरी आला होता. तायडे कुटुंबिय हे गणेश दांडगे यांच्या तेराव्याचा कार्यक्रमासाठी आले होते. मात्र हा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वीच झाला होता.  4 मार्च रोजी तायडे कुटुंब आपल्या मूळ गावी आमठाणा येथे परतणार होते. मात्र त्याआधीच ही दुर्दैवी घटना लावली. समर्थने खराब झालेली बॅटरी खेळताना कानाला लावली आणि त्याचा जोरदार स्फोट झाला. या स्फोटामुळे त्याच्या कानाला आणि बोटाला गंभीर जखमा झाल्या.


दरम्यान, समर्थला कुटुंबियांनी शासकीय ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. भोकरदन पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करुन त्याची नोंद केली आहे. दुसरीकडे तायडे कुटुंबाची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून समर्थाचे वडील हात मजुरी करतात. मिळेल त्या ठिकाणी ते काम करतात. त्यातच या घटनेनं त्यांना जबर धक्का बसला आहे.