जालना : यंदाच्या दुष्काळाने शेतकऱ्यांना जेरीस आणले आहे. खरीप आणि रब्बी तर हिसकावून घेतलीच पण पाण्यासाठी देखील मरमर करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. इथेच शेतकऱ्यांचे हाल संपले नाहीत. पावसाअभावी जमिनीत काहीच न पिकल्याने घरातील कर्त्या व्यक्तीने घर चालवण्यासाठी शहर गाठले आहे. घरी एकटया असलेल्या वृद्धांना घरकाम करून शेतात काम करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यंदाचा दुष्काळाने नातेसंबंधात फूट पाडून दूरावा आणलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील निपाणी पिंपळगावच्या एकनाथ आणि आसराबाई बनसोड वृद्ध दांपत्त्याला ज्या वयात आरामाची गरज आहे,त्या वयात त्यांच्यावर घरकाम करून शेतात राब-राब राबण्याची वेळ आली आहे. शेत जमिनीत पावसाअभावी काहीच पिकत नसल्याने संसार चालवणे अवघड झाल्याने बनसोड दाम्पत्यांचा मुलगा पुणे जिल्ह्यात कामासाठी गेला आहे. त्यामुळे मालकीच्या 2 एकर जमिनीची मशागत बनसोड दाम्पत्यांला या उतारवयात करावी लागत आहे. दोघांचंही वय 80 वर्षा पेक्षा जास्त असल्याने दोघांनाही गावातून रोज शेतात येता येत नाही. म्हणून शेतातच घर बांधून या दाम्पत्याने कायम स्वरूपी मुक्काम ठोकला आहे.


घराची झाडाझुड करून सकाळीच आसराबाईच्या दिवसाची सुरुवात होते. नंतर दिवसभर पुरेल इतकं पाणी त्या शेंदून काढतात. आसराबाईना ह्रदयविकाराचा एक झटका येऊन गेलाय. त्यामुळे जास्त वजन घेऊन त्यांना चालत येत नाही. त्यामुळे शेंदून काढलेल्या पाण्याचे हंडे घरात आणून ठेवण्याची जबाबदारी त्यांचे पती एकनाथ बनसोड पार पाडतात. आसराबाईना जास्त त्रास सुरू झाला की स्वतः एकनाथ बनसोड हेच सगळं पाणी भरतात.विहीर घरासमोरच असल्याने दूरवरून पाणी आणण्याचा तेवढा त्रास वाचलाय. पाणी भरणं झालं की,चुलीवर स्वयंपाक होतो. तेवढ्या वेळात एकनाथ बनसोड जनावरांना चारा पाणी करतात. नंतर ऊन कमी झालं की दोघांकडून शेतीकाम सुरू होतं. वावराचा फेरफेटका देखील मारला जातो.उन्हाच्या वेळेत गावातील लोक या जोडप्याशी गप्पा मारण्यासाठी येतात.त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करतात. वेळप्रसंगी मदत देखील करतात.


कमी पावसाअभावी या दाम्पत्याकडे असलेल्या 2 एकर जमीनीवरील उत्पन्नावर घरखर्च चालू शकत नव्हता.त्यामुळे बनसोड दांपत्याच्या मुलाने घर सोडलं. मुलाशिवाय एकटेच राहण्याची वेळ या कुटुंबावर आलीय.दुष्काळामुळे या दाम्पत्यांला सोडून मुलाला दूर जावं लागलंय.दोन एकरात जे उत्पन्न निघेल त्यात आसराबाईच्या संसाराच्या सगळ्याच समस्या सुटत नाही.ह्रदयविकाराचा आजार असतानाही गोळ्यांचा खर्च देखील भागवता येत नाही.पण या दाम्पत्यांच्या गोड स्वभावामुळे डॉक्टर स्वतः त्यांची तपासणी करण्यासाठी घरी येतात.सोबत गोळ्याही आणतात.त्यामुळे तेवढाच आधार या दाम्पत्याला मिळतो.दुष्काळाने मुलगा जरी दूर गेला असला तरी गावातील लोक या दाम्पत्यांच्या मदतीसाठी नेहमी धावून जातात.याचा त्यांनाही आनंद वाटतो.


पावसाच्या कमतरतेमुळे मराठवाड्यात अनेक कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करावं लागलंय.मात्र त्याचे परीणाम कुटुंबाला भोगावे लागतायत. दुष्काळाने ही परिस्थिती आणखीनच बिकट केलीय.त्यामुळे वरुणराजाने यंदातरी चांगलं बरसावं जेणेकरून वृद्ध माता पित्यांना त्यांच्या पोटच्या गोळ्यापासून दुरावा मिळणार नाही.