`लेकीचं लग्न कसं करू` शेतकरी बापानं भुईसपाट झालेलं पिक पाहून फोडला टाहो
`पै पै जमवून उभी राहिलेली बाग पाण्याखाली...लेकीचं लग्न कसं करायचं` बापानं गुडघाभर पाण्यात फोडला टाहो... हा व्हिडीओ एक नाही तर अशा अनेक बापांची व्यथा सांगणारा...ऐकून तुमच्याही डोळ्यात अश्रू येतील
नितेश महाजन झी मीडिया जालना: गेल्या चार दिवसांपासून धो धो कोसळत असलेल्या पावसानं शेतकऱ्यांची पिकं, बागा भुईसपाट केल्या आहेत. काही ठिकाणी पूरसदृश्यं परिस्थिती निर्माण झाली आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्याच्या तोंडचा घासही आस्मानी संकटानं हिरावून घेतला आहे. आता शेतकऱ्याच्या हातात केवळ भुईसपाट झालेली पिकं उरली आहेत.
पुन्हा जोमानं उभं राहता राहता शेतकरी बाप मात्र कोलमडून गेला आहे. या बापानं पै पै जमवून मोसंबीची बाग उभी केली. मात्र पावसानं सारं काही नुकसान केलं. मोसबी विकून त्यातून येणाऱ्या पैशातून आपल्या मुलीचं लग्न करून द्यायचं स्वप्न होतं. पूराच्या पाण्यात हे स्वप्न अगदी वाहून गेल्यासारखं झालं. डोळ्यासमोर फक्त नासधूस झालेली पिकं आणि अंधार दोनच गोष्टी होत्या.
बळीराजानं डोक्यावर हात मारून आपली व्यथा सांगितली. जालना जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हजारो शेतकऱ्यांच्या खरीप पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.पावसानं जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील किशोर मदन या शेतकऱ्याच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. किशोर मदन यांनी आपलं दु:ख झी 24 तासकडे व्यक्त केलं. पिकांमधून काहीही पैसे हाती येणार नसल्यानें मुलीचं लग्न आता मी कसं करू, असा सवाल उपस्थित करत या शेतकऱ्यानं थेट शेतात जाऊन डोक्यावर हात मारू लागला.
किशोर मदनला अश्रू अनावर झाल्यानं स्वतःला सांभाळता येत नव्हतं. सोन्यासारखं उभं राहता असलेल्या मोसंबीच्या बागांची नासधूस झाली. या शेतकऱ्याची संपूर्ण मोसंबी बाग पाण्यात असून मोसंबीची बाग देखील उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मुलीचं लग्न आलं रे बाबा आता मी काय करु...? पावसानं पिकांचं नुकसान झालेल्या हतबल शेतकऱ्यानं स्वत:च्याच डोक्यावर हात मारून रडू लागला आहे.