नितेश महाजन / जालना : लोकसभा मतदार संघातून यावेळी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर शिवसेनेकडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्यात लोकसभा निवडणुकीत युती झाली तरी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मैत्री पूर्ण लढत देऊ असे राज्यमंत्री खोतकरांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जालन्यातील लढत चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जालना लोकसभा मतदार संघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. 


कार्यकर्त्यांचे मेळावे आणि कार्यक्रमांचा धडाका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या जिल्ह्यात दुष्काळ आहे. मात्र जिल्ह्यात पाणीटंचाईपेक्षा लोकसभा निवडणुकीचीच जास्त चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली तरी मैत्रीपूर्ण लढत देणार असल्याचे खोतकरांनी जाहीर केले आहे. या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी दोघांकडूनही निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. याचाच एक भाग म्हणून खोतकरांनी कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले आहेत. आधी कुस्ती स्पर्धांचे आयोजन आणि आता भीम फेस्टीव्हल आणि पशु प्रदर्शन अशा कार्यक्रमांचा धडाकाही लावला आहे. तर दानवेंनी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या बुथनिहाय बैठकांचा धडाका लावला आहे.


सध्या भाजपचे नेते युतीच्या बाजूने आहेत. तर शिवसेनेकडून स्वबळाची भाषा सुरु आहे. त्यामुळे दानवे आणि खोतकर यांच्यातील निवडणुकीच्या प्रत्यक्ष लढाईची सुरुवात दोन्ही पक्षातील युती होणार की नाही यावर अवलंबून असणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच जालन्यात निवडणुकीच्या प्रचार सुरु आहे. शिवसेना आणि भाजपने या मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. दोन्ही राजकीय पक्षांनी आपली ताकद येथे लावलेली दिसत आहे. त्यामुळे यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वाना लागली आहे.