नितेश महाजन, झी मीडिया, अहमदनगर : जातपंचायतीचा निर्णय डावलून सासरच्या लोकांविरोधात पोलिसांत तक्रार दिल्याने जातपंचायतीने विवाहितेसह तिच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे. वैदू समाजाच्या जात पंचायतीने हा निर्णय घेतला असून जात पंचायतीच्या निर्णयानंतर पीडित महिलेला नातेवाईकांच्या लग्नातूनदेखील हाकलून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. २२ जानेवारी रोजी पुण्यातील जेजुरी येथे वैदू समाजाच्या जातपंचायतीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून हसनाबाद पोलिसांत सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे ही घटना उघडकीस आलीय. या प्रकरणी तात्या शिवरकर, अण्णा गोडवे, मोतीराम चव्हाण, श्यामराव शिंदे, बाळासाहेब लोखंडे, तात्या शिंदे आणि आणखी एका जणाविरोधात जालना जिल्ह्यातील हसनाबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.


दरम्यान या संदर्भातील जातपंचायत सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडालीय. या प्रकरणी हसनाबाद पोलीस अधिक तपास करत आहेत.