पुणे : 'जगभरात ज्या ज्या ठिकाणी धर्म नावाच्या व्यवस्थेचे प्रबल्य आहे अशा सर्व ठिकाणी तुम्हाला अन्याय, हिंसा, अत्याचार दिसेल, असे ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला चार वर्षे उलटूनही त्यांचे मारेकरी अद्याप मोकाटच आहेत. याच्या निशेधार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात आलेल्या 'जवाब दो' आंदोलनाच्या निमित्ताने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अख्तर बोलत होते. या वेळी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, दाभोलकर यांच्या पत्नी शैला दाभोलकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ आणि साधनाचे संपादक विनोद शिरसाठ उपस्थित होते.


या वेळी बोलताना देशातील परिस्थितीवर भाष्य करत नागरिकांना एक होण्याचे आवाहन करतानाच, 'जिथे प्रश्न विचारायला मुभा नसेल, ती जागा, तो देश, ते वातावरण निकोप कसे म्हणता येईल,' असा सवाल करत 'धर्माच्या आडून सत्ता राबवू पाहणाऱ्यांपासून आपण स्वतःला वाचवायला हवे,' असे अख्तर या वेळी म्हणाले. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही व्यवस्थेमुळेच आपला देश याला अपवाद आहे. मात्र, आज ही ओळख काहीशी पुसट होत चालली आहे. पण, लक्षा ठेवा समाजात विषवल्ली पसरू लागते, तेव्हा ती कुणालाच सोडत नाही. त्यामुळे अशा विषवल्लीपासून देशाला वाचवूया', असेही उद्गार ज्येष्ठ गीतकार  जावेद अख्तर यांनी काढले आहेत.