पोलीस बंदोबस्तात नाशिकमधून `जायकवाडी`ला पाणी सोडणार
जलसंपदा विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला
औरंगाबाद : नाशिकमधल्या धरणांतून जायकवाडीकरता पाणी सोडण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार २६ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान दारणा, गंगापूर आणि पालखेड धरणातून, पाणी सोडलं जाणार आहे. यावेळी गोदावरी नदीकाठावरच्या शेतकऱ्यांना पाणी न उचलण्याचा इशारा देण्यात आला आहे. महावितरणचे अधिकारी तसंच पोलीस बंदोबस्तात पाण्याचा हा विसर्ग होणार आहे.
त्यानंतर दोन दिवसांच्या फरकानं म्हणजेच २ नोव्हेंबरपर्यंत जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात हे पाणी मिळणं अपेक्षित आहे. जलसंपदा विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला.
जायकवाडीचे धरण भरेल असे प्रकल्प आपण नाशिक जिल्ह्यात करत असून यासाठी तीस हजार कोटी रुपये नियोजित केल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली. दमणगंगापिजाळ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी दिला असून २०,००० कोटी रुपये जलसंपदा विभागाला दिल्याचं त्यांनी म्हटलंय.
यामुळे येत्या काळात सर्व प्रकल्प पूर्ण होतील आणि पाण्यामुळे होणारी भांडणं न्यायालयात जाणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
के के वाघ महाविद्यालयात कर्मयोगिनी पुरस्कार सोहळ्यासाठी ते नाशिकला आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.