Jitendra Awhad On Shinde Govt : शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील शाळांमध्ये सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’ या उपक्रमाची सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळाच चर्चा होताना दिसत आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तसेच दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून उपक्रम सुरू केल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थी आणि पालकांसोबतची मुख्यमंत्र्यांच्या संदेशपत्रासह सेल्फी अपलोड करणे अपेक्षित आहे. त्यामुळे आता शाळकरी मुलांचा वापर राजकारणासाठी केला जातोय का? असा सवाल सध्या विचारला जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिंदे सरकारवर घणाघाती टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?


सन 2014 पासून निवडणुकीच्या प्रचारात विविध प्रकारच्या क्लृप्त्या वापरण्यात आल्या. आता तर महाराष्ट्रात प्रचाराचा अनोखा प्रकार उघडकीस आला आहे. दुसरी आणि तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांची सविस्तर माहिती देण्यात आली असून विद्यार्थ्यांकडून अभिप्राय घेण्यात येणार आहे. त्यानंतर पालक, विद्यार्थी व मंत्री यांच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर संवाद होणार आहे. या संवादात शिक्षणमंत्री सहभागी होणार आहेत. हे निवडणूक प्रचाराचे एक उत्तम माध्यम आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.


मात्र, या ठिकाणी सांगावेसे वाटते की, आधी शिक्षकांच्या रिक्त जागा भरा.. शाळांचे खासगीकरण थांबवा. दुसरी-तिसरीत शिकणाऱ्या मुलांकडून कसले अभिप्राय घेताय? त्या चिमुरड्यांना राजकारण, सत्ता याची जाणीव तरी आहे का? काय चालू आहे या महाराष्ट्रात? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.



दरम्यान, अनेक चांगल्या बाबी करण्याऐवजी ‘माझी शाळा सुंदर शाळा’ हा केवळ इव्हेंट असलेल्या कार्यक्रमातून कोणत्या गुणवत्तेचा प्रश्न सुटणार आहे, असा सवालही पालकांकडून विचारला जात आहे. तर राज्यातील 2.11 कोटी शाळकरी विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्याच्या पत्रासोबत सेल्फी काढून तो सरकारी वेबसाईटवर टाकण्याचा अट्टाहास का केला जातोय. असा सवाल देखील राजकीय विश्लेषकांनी विचारला आहे. विद्यार्थ्यांवर सेल्फी काढण्याची जबरदस्ती करणे योग्य नसल्याचं मत देखील काही पालकांनी व्यक्त केलं आहे.