अभिजित बिचुकलेला खंडणीप्रकरणी न्यायालयीन कोठडी
अभिजित बिचुकले याचा खंडणीच्या गुन्ह्यात सातारा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.
सातारा : अभिजित बिचुकले याचा खंडणीच्या गुन्ह्यात सातारा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. सातारा पोलिसांनी गोरेगाव मुंबई येथून बिचुकलेला अटक केली होती. रात्री छातीत दुखत असल्याचे कारण देऊन सातारा जिल्हा रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्याला सातारा न्यायालयात हजर करण्यात आले. चेक बाऊन्स प्रकरणी त्याला जामीन मिळाला. मात्र यावेळी पोलिसांनी आणखी एका खंडणीच्या गुन्ह्यात त्याला न्यायालयापुढे हजर केले. या गुन्ह्यात बिचुकले याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बिचुकले याच्यावर २०१२ मध्ये सातारा पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात त्याला ताब्यात देण्याची आणि पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी न्यायालयाला केली. त्याला जमीन द्यावा, अशी विनंती त्याच्या वकिलांनी केली. यावर दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
सोमवारी जिल्हा न्यायालयात पुन्हा जामीन मागण्यात येईल असे बिचुकले याच्या वकिलांनी संगितले. त्यामुळे सोमवारपर्यंत तरी त्याला तुरुंगात राहावे लागणार आहे. माझ्यावरील हा गुन्हा म्हणजे राजकीय षड्यंत्र असल्याचे बिचुकले म्हणाला.
दरम्यान, बिचुकले कोण आहे, याबाबत अनेकांना माहित नाही. तो मराठी बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर जास्त प्रसिद्धी झोतात आला. स्वत:ला कवी म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकलेने आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांने कित्येकदा खुले आव्हान दिले आहे.