उल्हासनगरात कब्रस्तानाचा मुद्दा पेटला
उल्हासनगरात मुस्लीम कब्रस्तानाचा प्रश्न चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळतंय.
उल्हासनगर : उल्हासनगरात मुस्लीम कब्रस्तानाचा प्रश्न चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळतंय. आज उल्हासनगरमधील नागरिकांनी शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांचा पुतळा जाळून त्यांचा निषेध केला तसंच महापौर मीना आयलानी यांचाही निषेध करण्यात आला. उल्हासनगर शहरात मुस्लिमांना कब्रस्तान नसल्यानं मुस्लीम बांधवांनी उपोषण सुरू केलं आहे.
कैलास कॉलनी भागातला एक भूखंड कब्रस्तानासाठी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र या भूखंडावर लोकवस्ती असून तिथल्या नागरिकांचं कुठलंही पुनर्वसन न करता घरं पाडण्याची कारवाई करण्यात येते आहे. यामागे शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर आणि उल्हासनगर महापालिकेच्या महापौर मीना आयलानी याच कारणीभूत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. याच रागातून आज उल्हासनगरमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आमदार किणीकर यांचा पुतळा जाळला. तर महापौर मीना आयलानी यांचाही नागरिकांनी निषेध केला. आमदार आणि महापौरांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.