कैलास पुरी, पिंपरी चिंचवड, झी 24 तास : काही दिवस वार्तापत्र, संकेतस्थळ आणि दूरचित्रवाणीच्या पडद्यावर कौतुक नसल्याने नाराज झालेले 'कृष्ण' सर आता मात्र भलतेच खुश झाले होते..! अनेक विचारांचे काहूर त्यांच्या मनात उठले होते...!  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरी चिंचवड परगण्यात भर दिवसा गोळीबार करून एकाला यमसदनी घालणाऱ्या त्या तीन गुंडांना कोण पराक्रमाने आपण पकडले..! त्या नतद्रष्टानी थेट पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला म्हणजे काय ...? ते ही आपल्या देखत...! आयर्न मॅन पुढे असे धाडस छे छे, त्यांना आपण सोडणार ते कसे...!  


आपण आपल्या बलदंड बाहूने झाड उपसले आणि शिताफीने पोलिसांवर गोळीबार करून धावणाऱ्या त्या गुंडांवर फेकले आणि ते कोसळले...! तेंव्हा कुठे बाकीच्या पोलिसांना त्या गुंडांना पकडणे शक्य झाले...! त्या पराक्रमच्या जोरावर आता परत चार कौतुकाचे शब्द कानावर पडले...! काहींनी आपल्या बहादुरीला थेट सलाम केला तर काहींनी कौतुकाचे चार शब्द लिहले...! 


आता कुठ पोलिस मुख्यल्यातल्या या दालनात जरा समाधान वाटत असल्याच 'कृष्ण' सरांना जाणवले...! पण 'कृष्ण' सरांना या कौतुक सोहळ्याचा आनंद फार काळ घेता आला नाही...! प्रसिद्धी प्रमुख कल्याण मन ईश त्यांच्या कडे धावत गेला आणि सोशल मिडियावर फिरत असलेल्या वार्ता त्यांना दाखवल्या...! 


पराक्रम करून तीन गुंड पकडून मिळालेले समाधान झटकन बाजूला झाले...! काय म्हणू आता या नतद्रष्टाना...! अरे 12 पोलिस हजर असताना आम्ही झाड फेकून मारण्याचा पराक्रम केला आणि त्यावर असा शक..! काय ते प्रश्न .....! 


आरोपी पळून जात असताना फेकून मारलेले हे झाड उपटून काढले की कुणी तिथे ठेवले होते,.....आरोपी जीवाच्या आकांताने डोंगराकडे धावत होते, तेंव्हा चिकटून धावत होते का म्हणे, कारण काय तर एका झाडात तिघे आरोपी पडले कसे, आणखी यांचा प्रश्न काय तर म्हणे एखादा पुढे नसेल का, तिघे एकाच रेषेत कसे धावत होते, आणखी काय प्रश्न तर आरोपी डोंगराकडे धावत असताना झाड गुरुत्वाकर्षण नियमानुसार फेकळ्यांतर खाली यायला हवे पण ते वर कसे गेले....हे काय प्रश्न आहेत..! 


आमच्या आयर्न मॅन, सिंघम या इमेजला धक्का देण्यासाठीच हे षडयंत्र यात कसलीच   शंका नाही...! अरे वेळ पडली असती तर आम्ही एन्काऊंटर केले असते पण आम्ही केवळ झाड फेकून मारण्यात समाधान मानले तर त्यात ही पन्नास प्रश्न...! या असंख्य विचाराने 'कृष्ण' सरांच डोके दुखू लागले, परगण्यात आल्यानंतर जे वैभव प्राप्त झाले होते ते मिळवायलाच हवे, आपल्यावर असे प्रश्न उपस्थित होणे हे काही खरे नाही असं त्यांच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले...! 


आता प्रत्यक्ष एन्काऊंटर कृतीतून उत्तर असा विचार त्यांच्या डोक्यात आला आणि त्यांनी तात्काळ मन ईश ला कुख्यात गुंडाच्या कुंडल्या काढायला सांगितल्या..! तिकडे झाडांच्या वाराने प्रचंड जखमी झालेल्या गुंडांनी झाडावरच निभावल असा विचार केला आणि डोळे मिटले तर ज्या झाडाच्या साहाय्याने 'कृष्ण' सरांनी प्रचंड पराक्रम गाजवले त्याची पाने शेळ्या खात होत्या तर पिंपरी चिंचवड परगणा सरांच्या पुढच्या पराक्रमाची वाट पाहत शांत झोपी गेला...!