आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण : देशात आणि राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर सध्या चौका चौकात चर्चा सुरू असल्याचे दिसून येतंय. पक्षात गट पडले तसे आता मित्रा-मित्रांमध्येही गट पडत आहेत. काही ठिकाणी तर प्रकरणा हाणामारीपर्यंत गेलं आहे. अशीच एक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. कल्याणमध्ये एका भांडी विक्रीच्या दुकानात देशातील राजकीय परिस्थितीवर दुकानातील दोन कामगारांमध्ये चर्चा सुरु होती. पण ही चर्चा इतकी विकोपाला गेली की एका कामगाराने दुसऱ्या कामगारावर चक्क हल्ला केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
कल्याण पश्चिमेतल्या बाजार पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भांडी विक्रीचं दुकान आहे. या दुकानात धीरज पांडे आणि मनिष गुप्ता हे दोन कामगार देशातील राजकीय सद्यस्थितीवर चर्चा करत होते. देशावर किती कर्ज आहे, बजेट काय आहे, आता देशातील परिस्थिती काय आहे, यावर चर्चा रंगली होती. चर्चा सुरु असताना धीरज पांडे यांनी एका मुद्दयावर टीका केली. जी मनिषला पटली नाही. या गोष्टीवरुन त्यांच्यात वाद झाला. 


पण प्रकरण इथेच संपलं नाही. हा वाद इतका टोकाला गेली की मनिष गुप्ताने रागाच्या भरात दुकानातील कूकरचं झाकण उचलून धीरजच्या डोक्यात मारलं. यात धीरज जखमी झाला. ही घटना पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली, बाजारपेठ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मनिष गुप्ताला अटक केली आहे.