आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण :  बँक मॅनेजरनं कट रचून आपल्याच बँकेवर दरोडा घातला आणि तब्बल 34 कोटी लंपास केले. डोंबिवली MIDC च्या ICICI बँकेत काम करणाऱ्या अल्ताफ शेखनं वेबसिरीज पाहून वर्षभरापासून आपल्याच बँकेवर दरोडा घालण्याचा कट रचला. त्यात तो यशस्वीही झाला. अल्ताफ शेखनं इतक्या शिताफीनं प्लानिंग केलं होतं की दरोड्याचा तपास करायला पोलिसांना तब्बल दोन महिने लागले. अल्ताफ स्वत: कॅश कस्टडियन असल्यानं त्याला सुरक्षा यंत्रणांची खडानखडा माहिती होती. त्याची प्लानिंग पाहून तुम्हीही थक्क व्हाल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असा रचला दरोड्याचा कट 


- अल्ताफने सुरक्षा यंत्रणांतील त्रुटींचा अभ्यास केला


- सुट्टीच्या दिवशी काम करत बँकेचे सर्व अलार्म निष्क्रिय केले


- सर्व कॅमेऱ्याच्या हार्ड डिस्क काढल्या


- सीसीटीव्हीचा डीव्हीआर लंपास केला 


- बँकेच्या तिजोरीतील तब्बल 34 कोटींवर डल्ला मारला


- 34 कोटी रोकड ताडपत्रीत बांधली


- एसी डक्टमधील छिद्रातून ताडपत्री बँकेच्या मागच्या बाजूला फेकली


- मित्रांच्या मदतीनं 34 पैकी 12 कोटी लंपास केले


- नवी मुंबईत एक घर भाड्यानं घेऊन त्यात सारी कॅश ठेवली


त्यानंतर अल्ताफनं स्वत:च बँकेवर दरोडा पडल्याची माहिती वरिष्ठांना दिली आणि मानपाडा पोलिसांना तक्रार दिली. ठाणे आणि नवी मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करायला लागले. तब्बल अडीच महिन्यांनंतर अल्ताफचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी अल्ताफसह कुरेश, अहमद खान आणि अनुज या त्याच्या तीन साथीदारांना तसंच त्याची बहिण निलोफरला बेड्या ठोकल्यात. 34 कोटींपैकी 22 कोटी एसीच्या डकमध्येच होते. तर 12 कोटी अल्ताफ आणि त्याच्या साथीदारांकडून रिकव्हर करण्यात आलेत. काही रक्कम बँकेच्या जिन्याच्या खाली ठेवण्यात आली होती.


सिनेमा आणि वेबसीरिज पाहून चोरांनी दरोडा घालण्याच्या घटना तशा नव्या नाहीत. मात्र मॅनेजरनं सिनेस्टाईल आपल्याच शाखेत एवढी मोठी रक्कम लुटण्याची ही पहिलीच घटना असेल. आता बँकेचे मॅनेजरही दरोडा घालायला लागले तर जनतेनं पैसे ठेवायचे कुठे? असा प्रश्न सामान्य जनतेला पडलाय.