आतिष भोईर, कल्याण : डी-मार्टमध्ये खरेदीसाठी रोज मोठी गर्दी होत असते. कल्याणमधील डी-मार्ट हे देखील गर्दीचं एक मोठं ठिकाण आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकं खरेदीसाठी येत असतात. पण आता D-mart मधील ६ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कल्याणचं हे डी-मार्ट ५ दिवस बंद ठेवण्याचे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेने दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण पश्चिमेला बैलबाजार परिसरात असणाऱ्या डी-मार्ड मध्ये काम करणारे 6 कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने अनेकांच्या चिंता वाढल्या आहेत. कारण या ठिकाणी सगळ्याच परिसरातून लोकं खरेदीसाठी येत असतात. एकाच वेळी इतके कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर डी मार्ड  बंद करण्यात आले आहे. या ठिकाणी जाऊन आलेल्या लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन केडीएमसीतर्फे करण्यात आले आहे.


बैलबाजार परिसरात असणाऱ्या डी-मार्ड इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. कोणत्याही वेळेला आले तरी गर्दीच असते. इथली गर्दी पाहता केडीएमसीने याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चाचणी घेतली. ज्यामध्ये 6 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. पुढील 5 दिवसांसाठी डी-मार्ट बंद राहणार आहे. अशी माहिती केडीएमसीच्या साथरोग नियंत्रण अधिकारी प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे. 


कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना आणखी एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात हजारो लोकं आले असतील. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कल्याण-डोंबिवलीत आता परिस्थिती हाताळताना प्रशासनाला आणखी काळजी घेण्याची गरज आहे. 


कल्याण-डोंबिवलीत आजही ५०० हून अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत कालही हा बाजारांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. प्रशासनाकडून देखील कारवाईच्या बाबतीत दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यात नागरिक देखील निष्काळजीपणा करत असल्याने कोरोनाचा धोका आणखी वाढताना दिसत आहे.