कल्याण : तुर्कस्तानवरुन डोंबिवलीत आलेल्या एका २६ वर्षीय तरुणाने होम क्वारंटाईन न राहता आपल्या नातेवाईकांच्या हळदी समारंभ आणि  लग्नसोहळयात हजेरी लावली. दरम्यान, तो तरुण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. त्याच्यासह दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी करु नका, ठरलेले कार्यक्रम रद्द करा किंवा पुढे ढकला, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवडाभरापूर्वीच दिल्या होत्या. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करत अनेकांचा जीव धोक्यात घातला गेला आहे. यासोहळ्याला कल्याण-डोंबिवलीचे नगरसेवकही  या लग्न सोहळ्यास उपस्थित होते. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवलीत १९ मार्च रोजी झालेल्या एका लग्नात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरांनी हजेरी लावल्याचे बाबपुढे येत आहे. लग्नाला आणि हळदी समारंभाला उपस्थित असलेल्या नवऱ्याच्या घरातील तरुणाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच लग्नात असलेली एक तरुणीही कोरोनाबाधीत झाली आहे. यामुळेच लग्नाला उपस्थित असलेल्या सर्वांनाच होम क्वारंटाइनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केडीएमसीच्या महापौरांनाही १४ दिवस विलगीकरणात राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.


 डोंबिवली पूर्वेतील आयरे परिसरात राहणारा हा तरुण १५ मार्चला तुर्कस्थानवरून आला होता. मुंबईत आल्यावर त्याला होम क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगण्यात आले होते. पण क्वारंटाईनमध्ये न राहता त्याने १८ आणि १९ मार्च रोजी चुलत भावाच्या  हळदी आणि लग्न सोहळयाला हजेरी लावली होती.  त्यानंतर त्याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास झाल्याने त्याला मुंबईच्या कस्तुरबा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होते. तर त्याच्या कुटुंबीयांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र निष्काळजीपणा केल्याने पोलिसांनी त्या तरूणावर लग्न सोहळा आयोजकांवर आणि त्या लग्नासाठी जागा उपलब्ध करून देणारे असे तीन जणांवर गुन्हा दाखल करुन कारवाई केली आहे.