कल्याण : वाहतूक कोंडीमुळे कल्याण-डोंबिवलीकरांचे होणारे हाल दिवसेंदिवस वाढतच आहे. डोंबिवलीतून मुंबईत पोहोचण्यासाठी डोंबिवलीकरांना रोज रेल्वे अभावी रस्तेप्रवास करावा लागतोय. मात्र या रस्ते प्रवासात प्रचंड हाल होत आहेत. बाई, कार, बस, टॅक्सी, रिक्षा या माध्यमातून लोकं डोंबिवलीतून ठाणे, मुंबईत पोहोचत आहेत. या प्रवासासाठी अगदी चार चार तास लागत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळात कल्याण शीळ रस्त्यावरच पहिले दोन तास मोडतात. वाहनांची चौपटीने वाढलेली संख्या, अरूंद रस्ता, जागोजागी खराब झालेला रस्ता, खड्डे, रस्ता रूंदीकरणाचं काम, काटई नाक्यावरचा अरूंद टोलनाका, कोकण रेल्वे मार्गावरचा धोकादायक पूल, नियोजन न करता बांधलेलं पलावा, पलावा जंक्शनच्या पाचवीला पुजलेली कोंडी यातून मार्ग काढत हजारो वाहनं शीळफाट्याकडे जातात. 


डोंबिवली ते शीळफाटा हे अवघं 13 किलोमीटरचा अंतर पार करण्यासाठी तब्बल दीड तास लागत आहे. रोज ऑफिसला होणारा उशीर, गर्दीत, ट्रॅफिकमध्ये होणारी खरडपट्टी, मनस्ताप यातून कल्याण-डोंबिवलीचा चाकरमानी जात आहे. महानगरी मुंबई धावती राहावी यासाठी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरकर राबतात पण त्यांना ऑफिसमध्ये पोहोचण्यासाठी प्रशासन धड चांगले रस्ते सुविधा देऊ शकत नाहीये ही वस्तूस्थिती आहे.