स्वाती नाईक, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Navi Mumbai Crime News:  कामोठे सेक्टर 6 येथे काही दिवसांपूर्वी दोन मृतदेह आढळले होते. घरात आई आणि मुलाचा मृतदेह सापडला होता. दोघांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला होता. आता या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तसंच, हत्येचे कारणदेखील समोर आलं आहे. यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुहेरी हत्याकांडाने कामोठे शहर हादरले होते. कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक 104 मध्ये 70 वर्षीय गीता जग्गी आणि त्यांचा 45 वर्षीय मुलगा जितेंद्र जग्गी यांचा मृतदेह आढळला होता. जितेंद्रच्या अंगावर मारल्याचे व्रण असल्याने कामोठे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली होती. 


पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या सहाय्याने तपास केला असता संशयित आरोपी संज्योत दोडके आणि शुभम नारायणी यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी दोघांची चौकशी सुरु केल्यानंतर सुरुवातीला दोघांनीही काही सांगण्यास नकार दिला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच दोघा आरोपींनी गुन्हा कबुल केला आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरच्या रात्री जितेंद्रने संज्योत आणि शुभम या दोघांनाही घरी पार्टी करण्यासाठी बोलावले होते. पार्टीमध्ये मद्य प्राशन केल्यावर जितेंद्र दोघा आरोपीकडे समलैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी आग्रह करत होता. जितेंद्रचा त्रास वाढल्याने वैतागलेल्या शुभम नारायणी याने एक्स्टेंशन बोर्ड जितेंद्रच्या डोक्यात मारून त्याची हत्या केली. तर संज्योत दोडकेने जितेंद्रची आई गीता जग्गी यांची गळा आवळून हत्या केली. याप्रकरणी दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून


नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जल्लोष सुरू असताना नाशिक येथील मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत उंटवाडीत एका सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. मारेकरी देखील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. संशयित मारेकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले असून मुंबई नाका पोलीस ठाण्यात करण्यात आला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.