Sanjay Raut On Kasba Bypoll Result: पुण्यातील कसबा (Kasba Bypoll Result) आणि चिंचवड (Chinchwad Bypoll Result) पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. यापैकी कसबा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपाला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे हेमंत रासने यांना पराभूत करत कसब्यामध्ये 28 वर्षानंतर पहिल्यांदाच बिगरभाजपा पक्षाचा झेंडा फडकला आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाला आपली जागा कायम राखण्यात यश मिळालं आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीला बंडखोरीचा मोठा फटका बसला असून भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र दिसत आहे. असं असतानाच दोन्ही निकालांवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपाला टोला लगावला आहे. खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवताना राऊत यांनी कसब्यामध्ये भाजपा उमेदवारासाठी प्रचारसभा घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा थेट उल्लेख केला आहे.


फडणवीस यांना टोला...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत भाजपा शिवसेनेच्या पाठिंब्यावर कसब्यामध्ये जिंकत आली. आता दिल्ली आणि फडणवीसांना खरी शिवसेना कुठे आहे हेकळलं असेल असा टोला राऊत यांनी भारतीय जनता पार्टीला लगावला आहे. कसब्यामधील निकालासंदर्भात पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता संजय राऊत यांनी दिल्ली, महाराष्ट्र आणि फडणवीस यांचा उल्लेख करत खरी शिवसेना ठाकरे गटच असल्याचं सूचकपणे सांगितलं. "महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे. आतापर्यंत कसब्यामध्ये शिवसेनेच्या पाठिंब्याने भाजपा जिंकत आली. आज महाराष्ट्राला, दिल्लीला आणि फडणवीसांना कळलं असेल की खरी शिवसेना कुठे आहे," असं संजय राऊत म्हणाले.


...तर चिंचवडमध्येही लढलो असतो


तसेच चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बंडखोरीचा फटका बसला असंही राऊत यांनी म्हटलं. "चिंचवडची जागा सुद्धा पहिल्या फेरीपासून जिंकू शकत होतो. अजून तिथे संघर्ष सुरु आहे. एकाशीच लढत झाली असती तर ती जागा सुद्धा जिंकलो असतो," असं राऊत चिंचवडमधील संघर्षाबद्दल म्हणाले.


आदित्य ठाकरेंचीही प्रतिक्रिया


कसब्यामधील विजयासंदर्भात भाष्य करताना ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे यांचे पुत्र आदित्य ठाकरेंनी धंगेकर यांचा विजय बोलका असल्याचं म्हटलं. "सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही सुरू आहे ते जनतेला मान्य नसल्याचं हा निकाल दर्शवतो. वाढती महागाई, महाराष्ट्रातून निघून चाललेले उद्योग यामुळे जनता त्रस्त झाल्याचं दिसत आहे," असं आदित्य म्हणाले.


हेमंत रासनेंची प्रतिक्रिया


कसब्यामधील भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांनी पराभव स्वीकारला असून पराभवानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. "उमेदवार म्हणून मी कमी पडलो. पक्षाने मला संधी दिली पण मीच कमी पडलो. हा पराभव मला मान्य आहे. या पराभवाची कारणं आपण शोधणार आहोत," असं हेमंत रासने यांनी म्हटलं आहे.