कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत असलेल्या अनधिकृत इमारतींवर आज महापालिकेनं कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. कल्याण आणि डोंबिवली शहरांना लागून मोठा ग्रामीण परिसर असून या भागात पालिकेची कुठलीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकामं करण्यात येतात. कल्याणच्या आडीवली, ढोकळी आणि पिसवली गावातही अशाचप्रकारे अनधिकृतपणे थेट सात ते आठ मजल्यांचे टॉवर उभारण्यात आले होते. 


या बांधकामांवर आज केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके, उपायुक्त सुनील जोशी आणि महापालिकेच्या पथकानं कारवाई सुरू केली. अजस्त्र पोकलेन मशीनच्या साहाय्यानं या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. यापुढे डोंबिवलीच्या २७ गावातही अशीच कारवाई करण्यात येणार असून महापालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी खासगी बाऊन्सर्स मागवण्यात येणार असल्याची माहिती बोडके यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात ही कारवाई आणखी जोरदार पद्धतीनं होण्याची शक्यता आहे.