पुणे : पुण्यातल्या व्यावसायिकाची अपहरण करुन साताऱ्यात हत्या करण्यात आली आहे. चंदन शेवानी असं व्यापाऱ्याचं नाव आहे. त्यांचं पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावर फुटवेअरचं दुकान आहे. शनिवारी संध्याकाळपासून ते बेपत्ता होते. २ कोटींच्या खंडणीसाठी त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. शेवानी यांचा मृतदेह सातारा जिल्ह्य़ातल्या खंडाळा तालुक्यातील पाडेगाव कॅनॉलजवळ सापडला. डोक्यात गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंडगार्डन परिसरातील परमार पॅरेडाईज येथे चंदन शेवानी हे वास्तव्यास होते. शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या कुटुंबियांनी बंडगार्डन पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पण शेवानी यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यानतंर रविवारी दुपारी पाडेगाव येथे कॅनॉलजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची बातमी पोलिसांनी मिळाली. लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर हा मृतदेह शेवानी यांचा असल्याचं तपासात समोर आलं. अंगावर तीक्ष्ण शस्त्राने वार आणि डोक्यात गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. 


पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली होती. ज्यामध्ये दोन कोटी न दिल्याने हत्या केल्याचं म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.