कल्याण : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिचा डोळा लागला आणि सहा महिन्यांच्या बाळाचे अपहरण झाले. (Abduction of a baby) त्यानंतर आईची शोधाशोध आणि धावा धाव सुरु झाली. मात्र, तिचे बाळ काही सापडले नाही. तिने स्वत:ला दोष देण्यास सुरुवात केली. मात्र, ती बैचेन होती. तिने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि रितसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही आधार घेत तिच्या बाळाला शोधून काढले आणि पाच जणांच्या टोळक्याला अटक केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण स्टेशन परिसरात एक महिला आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकल्यासोबत झोपली होती. तिचा डोळा लागल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी तिच्या चिमुकल्याचे अपहरण केले. काही वेळाने बाळ जवळ नसल्याचे तिच्या लक्षात आले. तिने आजूबाजुला शोध घेतला. मात्र बाळ न दिसल्याने तिने याबाबत महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांच्या पथकाने अवघ्या 48 तासात अपहरण करणाऱ्या पाच आरोपीना बेड्या ठोकल्या.


अपहण करण्यात आलेल्या बाळाला सुखरुप त्या माऊलीच्या स्वाधीन केले आहे. विशाल त्र्यंबके, कुणाल कोट, आरती कोट, हिना माजिद, फरहान माजिद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विशाल याने कुणाल कोट याच्या मदतीने या बाळाचे अपहरण केले. या दोघांनी हे बाळ सांभाळण्यासाठी आरती हिला दिले. हे तिघे हे बाळ हिना माजिद, फरहान माजिद या दाम्पत्याला विकणार होते. मात्र पोलिसांनी हा डाव उधळून लावला. त्यांनी झटपट श्रीमंत होण्यासाठी मुले चोरीचा मार्ग निवडला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तर माजिद दाम्पत्यला दोन मुली असून त्यांना मुलगा होत नसल्याने त्यांनी वाटेल त्या किमतीत मुलगा दत्तक घेण्याची तयारी दाखविली होती. त्यासाठी चोरट्यांनी या बाळाचे अपहण केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त (परिमंडळ 3) विवेक पानसरे यांनी दिली.