प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : इच्छाशक्ती म्हणजे काय? ते किरण बावडेकर यांच्याकडून शिकावं... नियतीनं अनेक अपघात त्यांच्यावर केले, पण हे सगळ्याला पुरून उभे राहिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर जिल्ह्यातल्या निगवे दुमाला इथे राहणारे हे किरण बावडेकर... वयाच्या चौथ्या वर्षी त्यांना पोलिओ झाला... चालणंही कठीण होतं... पण या सगळ्यावर मात करत किरण बावडेकर उभे राहिले... फक्त चालणंच नव्हे तर शरीरसंपदा कमवत कुस्त्यांचा फडही गाजवू लागले. आजवर त्यांनी साडेचारशेवर कुस्त्या केल्या. पण, 'फिजिकली अनफीट' या प्रमाणपत्रामुळे कुठल्याही शासकीय स्पर्धेत त्यांना उतरता आलं नाही. मग ते अपंगांच्या स्पर्धेंत भाग घेऊ लागले.


पंजाब विद्यापीठात झालेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्यांनी दोन वेळा सुवर्णपदक पटकावलंय. आपण देशाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशानं त्यांनी २००० साली व्यायामशाळेची स्थापना केली. या व्यायाम शाळेच्या माध्यमातून ते तरुणांना सैन्यात आणि पोलिसांत जाण्याचं प्रशिक्षण देतात.


 


किरण बावडेकर यांचे दोन्ही पाय पोलिओमुळं निकामी झाले होते. पण किरण यांनी जिद्दीच्या जोरावर या पायात ताकद आणली. पण काही दिवसांपूर्वीच पुन्हा त्यांना अपघात झाला. त्यात दोन्ही पायांना गंभीर इजा झालीय, दोन्ही पायांत सळ्या घातल्यायत. तरीही किरण यांनी व्यायामाची साधना काही सोडली नाही. आजही किरण बावडेकर स्वतः रोज दोन तास व्यायाम करतात. त्याचबरोबर तरुणांना मार्गदर्शनही करतात.


आतापर्यंत बावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निगवे दुमाला आणि परिसरातले तब्बल तीनशेहून अधिक तरुण सैन्यात आणि पोलीस सेवेत दाखल झालेत.


चरितार्थ चालवण्यासाठी किरण बावडेकर यांच्याकडे जिल्हा बॅंकेची नोकरी आहे. पण  तरुणांना तंदुरुस्त ठेवणं, देशसेवेसाठी त्यांना तयार करणं हे जास्त महत्त्वाचं असल्याचं बावडेकर यांना वाटतं.... म्हणूनच आजही किरण बावडेकर स्वतःच्या अपंगत्वावर मात करत हजारो तरुणांसाठी खंबीरपणे उभे आहेत...