प्रताप नाईक, झी मीडिया कोल्हापूर : देशभरात आईभवानीचा जागर सुरू झालाय. मुंबईसह महाराष्ट्रभर मायभवानीचा नवरात्रौत्सव (Navratrostav) सार्वजनिक रुपात साजरा केला जातो. ठिकठिकाणी अंबेमातेचा उत्सव गरबा (Garba) खेळून रात्र जागवून तर बंगाली बांधव आपल्या दुर्गापूजेत घागरी फुंकून साजरा करतात. दोन वर्षाच्या कोरोनाकाळानंतरचा हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. कोल्हापूरातही अनेक ठिकाणी मोठ्या उत्सहाने हा सण साजरा केला जातोय. पण नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरबा खेळण्यासाठी चक्क ॲम्ब्युलन्सचा वापर केला गेल्याचं समोर आलं आहे. कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (Kolhapur Government Medical College) हा धक्कादायक प्रकार आहे. वैद्यकीय महाविद्यातील शिकाऊ महिला डॉक्टर्सने गरबा खेळायला जाण्यासाठी अॅम्ब्युलन्सचा वापर केला. या सर्व महिला डॉक्टर कोल्हापूरातल्या हॉकी स्टेडिअममध्ये रविवारी रात्री गरबा खेळण्यासाठी जात होत्या. तिथे लवकर पोहोचण्यासाठी त्यांनी ॲम्ब्युलन्सचा वापर केला. धक्कादायक म्हणजे वाहतूकीचा अडथळा येऊ नये यासाठी ॲम्ब्युलन्स जोरजोरात सायरन वाजत रस्त्याने निघाली. ॲम्ब्युलन्समध्ये जवळपास पंधरा ते 20 शिकाऊ महिला डॉक्टर होत्या. 


पण वेगाने जात असताना ॲम्ब्युलन्सने रस्त्यातील दोन वाहनांना धडक दिली. त्यानंतर ॲम्ब्युलन्स थांबवण्यात आली आणि तपासणी  केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. सुरुवातीला लोकांना ॲम्ब्युलन्समध्ये पेँशट असून त्याला वेळेवर रुग्णालयात पोहोचवण्यासाठी ॲम्ब्युलन्स वेगात जात असल्याचं वाटलं. पण वाहनांना धडक दिल्यानंतर ॲम्ब्युलन्स थांबवण्यात आली. दरवाजा उघडला असता ॲम्ब्युलन्समध्ये पेंशट नाही तर  कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिकाऊ महिला डॉक्टर असल्याचं आढळलं. त्यांच्याकडे चौकशी केली असता. या सर्व मुली हॉकी स्टेडिअमवर गरबा खेळण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली.


ही रूग्णवाहिका कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची होती. यातून प्रवास करणा-या तरूणी महाविद्यालयातील विद्यार्थिनी असल्याचं सांगण्यात येतंय. एकीकडे रूग्णवाहिका वेळेत मिळत नसल्यानं अनेकांना जीव गमवावा लागतोय. दुसरीकडे या शासकीय रूग्णवाहिकेचा मात्र असा गैरवापर सुरूंय.