प्रताप नाईक, झी २४ तास, कोल्हापूर : कोल्हापुरात क्षुल्लक कारणावरुन दोन गटांत तुफान दगडफेक करण्यात आलीय. या दगडफेकीत तीन पोलीस कर्मचारी आणि पाच नागरिक जखमी झालेत. कोल्हापूर शहरातल्या सोमवारी पेठ परिसरातल्या घिसाड गल्ली भागात ही घटना घडलीय. या परिसरात अशा घटना काही नवीन नाहीत. परंतु, मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत पोलिसांनाही जखमी व्हावं लागलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलं क्रिकेट खेळत असताना वादाची ठिणगी पडली आणि हा वाद पेटला... एका गल्लीतील मुलं क्रिकेट खेळत असताना दुसऱ्या गल्लीतला एक मुलगा परिसरातून जात असताना त्याला पकडून बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर मारहाण झालेल्या मुलाच्या बाजुचा गट दुसऱ्या गटातील व्यक्तीच्या घरावर चाल करून गेला आणि हा वाद पेटला. दोन्ही गटांच्या बाजुनं काचेच्या बाटल्या एकमेकांवर फेकण्यात आल्या... दगड आणि विटाही फेकण्यात आल्या. ही हाणामारी जवळपास १५ ते २० मिनिटे सुरू होती. 


हाकेच्या अंतरावर लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन होतं. पोलीस घटनास्थळीही तातडीनं दाखल झाले... परंतु, जमाव इतका मोठा होता की तत्काळ या घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची कुमक कमी पडली. परंतु, पोलिसांनी जमाव पांगवण्यात यश मिळवलं. दरम्यान, या दगडफेकीत आपली ड्युटी बजावत असतानाच पोलिसांनाही जखमी व्हावं लागलं. पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्या कानाला दुखापत झाली तर पोलीस निरीक्षक सुनील पवार हेदेखील जखमी झाले. इतकं होऊनही पोलिसांनी प्रसंगावधान राखत वेळीच या परिस्थितीवर ताबा मिळवला.


दोन्ही गटांतील समाजकंटकांवर पोलिसांनी कारवाई सुरू करत धरपकड सुरू केलीय. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पोलिसांकडून शांततेचे आवाहन करण्यात येत आहे.