Sanjay Mandlik on Shahu Maharaj : कोल्हापूरचे भाजप खासदार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने राज्यात गदारोळ उडाला आहे. आताचे महाराज खरे वारसदार नाही, ते दत्तक आलेले आहेत असं विधान करत खासदार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे आता कोल्हापुरासह राज्यभरातून शाहूप्रेमींकडून रोष व्यक्त केला जात आहे. मंडलिक यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत माफी मागावी अशी मागणी होत असताना त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. एक शब्द चुकलो असे म्हणत मी अपमान केला नाही, असा दावा मंडलिक यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिक यांनी हे विधान केलं आहे. "आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का?  ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे आपण कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहोत. माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थानं पूरोगामी विचार जपला," असं संजय मंडलिक म्हणाले आहेत. मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायचे नाही मग ती कुस्ती कशी होणार? असेही संजय मंडलिक म्हणाले. 


संजय मंडलिकांनी दिलं स्पष्टीकरण


"मी एका शब्दानेसु्द्धा शाहू महाराजांचा अपमान केलेला नाही. आजसुद्धा त्यांच्याविषयी आदर आहे. फक्त मी एवढंच म्हणालो की ते थेट वारसदार नाहीत. थेट वारसदार तुम्ही आम्ही आहोत हा माझा विचार आहे. संजय मंडलिकांनी कशाबद्दल माफी मागायची. ते थेट वारसदार आहेत की नाही हे त्यांनी सिद्ध करावं. मात्र माझं म्हणणं काही चुकलं असेल तर मी माफे मागेल," असा दावा खासदार संजय मंडलिक यांनी केला आहे.


"त्यात एवढं काय आभाळ कोसळलं आहे. मी शाहू महाराजांना विचारू इच्छितो की आपण दत्तक आहात की नाही याचं उत्तर द्या. दत्तक असाल तर दत्तक विधान कायदेशीर झालं आहे की नाही याचंही उत्तर द्या. यामध्ये कशाचा अपमान झाला हेसुद्धा आम्हाला सांगा," असाही सवाल संजय मंडलिक यांनी केला.