Kolhapur News : श्री क्षेत्र जोतीबा देवाच्या चैत्रातील यात्रेच्या दुसाऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी रात्री कोल्हापूरकर आणि अखंड महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या अंबाबाई देवीनं भक्तांच्या भेटीसाठी मंदीर सोडलं. अर्थात देवी भक्तांच्या भेटीसाठी मंदिराबाहेर बाहेर पडते, यालाच नगरप्रदक्षीणा असंही म्हटलं जातं. जोतीबाला आलेल्या भक्तांना अंबाबाई देवीचं दर्शन घेता यावं या उद्देशानं सुरु झालेली हि परंपरा आजही मोठ्या उत्साहात सुरु आहे. (Kolhapur news jotiba yatra ambabai rathotsav video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्षी चैत्र पौर्णिमेला गुरुवारी रात्री अंबाबाई देवीचा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. देवीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या रथातून आई अंबाबाईचा रथोत्सव संपन्न झाला. 


दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या जोतीबाच्या चैत्र यात्रेसाठी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक,गोवा आणि गुजरात राज्यातील भक्त लाखोंच्या संख्येनं येतात. या भक्तांना दक्षीणकाशी अशी ख्याती असणाऱ्या अंबाबाई देवीचं दर्शन करता यावं यासाठी राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी 1914 साली अंबाबाई देवीची नगरप्रदक्षीणा काढण्याची परंपरा सुरु केली. तेव्हापासुन आजपर्यंत जोतीबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाई देवीची नगरप्रदक्षिणा काढली जाते. 



यंदाच्या वर्षीही मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. यादरम्यान गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अंबाबाई देवीचा नवीन रथ मंदिरातुन बाहेर पडला. देवीच्या नगरप्रदक्षिणा मार्गावर भक्तांमार्फत फुलांच्या पायघड्या घालुन रांगोळी काढण्यात आली होती. पारंपारीक वाद्याच्या गजरात आणि पोलीस बॅन्डच्या गजरात नगरप्रदक्षिणेला सुरवात झाली. त्यानंतर , गुजरी, भवाणी मंडप, मिरजकर तिकटी मार्गे हा रथोत्सव पुढे मार्गस्थ झाला. 


हेसुद्धा वाचा : Jotiba Yatra 2023 : जोतिबाच्या नावानं चांगभलं! दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेत सासनकाठ्यांचं महत्त्व का असतं?


 


नगरप्रदशिणा मार्गावर भक्तांनी अंबाबाई देवीवर फुलांची उधळण केली. त्याचबरोबर फटक्यांची आतषबाजी करत देवीचं स्वागत करुन दर्शनही घेतलं. दरम्यान, कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी देखील रथोत्सवाला उपस्थिती लावत आई अंबाबाई देवीचे दर्शन घेतलं. यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी आई आंबाबई साठी तयार करण्यात आलेल्या नव्या रथाचे पूजन मला करायला मिळालं हे माझं भाग्य समजतो अशी प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर कोल्हापूर आणि संपूर्ण महाराष्ट्रला आई आंबाबईचा आशीर्वाद मिळो आणि राज्याचा विकास होवो अशी प्रार्थना देवीच्या चरणी केली.