सबसे कातिल गौतमी पाटीलला गणेशोत्सवात एन्ट्री नाही, कारण...
Gautami Patil : गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 22 आणि 24 सप्टेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : जिथं नाच तिथं वाद आणि राडा असं समीकरण झालेल्या नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कोल्हापुरातील प्रस्तावित दोन्ही कार्यक्रमांना कोल्हापूर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सवात
(Ganeshotsav 2023) सुरक्षेचा ताण पाहता पोलिसांनी गौतमीचे कार्यक्रम ठेवण्या मनाई केली आहे. गौतमीचे राज्यात ज्या ठिकाणी कार्यक्रम पार पडले आहेत त्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा पोलिसांनी द्यावी लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात होणारे गौतमीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
कोल्हापूर पोलिसांसह (Kolhapur Police) मनोरंजन विभागानेही परवानगी नाकारली आहे. 22 आणि 24 सप्टेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. उत्सव काळात कार्यक्रमासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त देऊ शकत नसल्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले.
माझ्या कार्यक्रमात गोंधळ होत नाही
दुसरीकडे, तीन दिवसांपूर्वी बारामतीमध्ये बोलताना गौतमीने 'माझ्या कुठल्याही कार्यक्रमात गोंधळ होत नाही', असं भाष्य केलं होतं. 'माझ्या सगळ्याच कार्यक्रमात गोंधळ होत नाही. पण एखाद्या कार्यक्रमात गोंधळ झाला की लोक तेच धरून बसतात' असं गौतमीने म्हटलं आहे. बारामती तालुक्यातील झारगडवाडीकरांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यामुळे दहीहंडीचा माझा कार्यक्रम शांततेत पार पडला. काही अपवाद वगळता माझे सर्वच कार्यक्रम शांततेच पार पडतात' असं गौतमी म्हणते.
कोण आहे गौतमी?
सबसे कातील, गौतमी पाटील. महाराष्ट्राची लावणी डान्सर गौतमी पाटीलने (Gautami Patil) संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. कधी डान्स, तरी राडा यामुळे गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. गौतमीच्या कार्यक्रमाला होणारी मोठी गर्दी आणि त्यामधील वाद ही काही नवी बाब राहिलेली नाही.
सात हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया
दुसरीकडे, गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारतानाच कोल्हापूर पोलिसांनी तब्बल सात हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवात व्यत्यय निर्माण करण्याची शक्यता आहे अशा 3816 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. 2219 जणांकडून चांगल्या वर्तणुकीच्या जामीनासह बॉन्ड घेण्यात आले आहेत. 171 जणांकडून चांगल्या वर्तणुकीचे बॉन्ड घेणेत आलेले आहेत. तिघांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. सणाच्या कालावधीत हद्दीमध्ये, मंडळाजवळ अथवा मिरवणुकीमध्ये प्रवेश करणेस 641 जणांवर मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अशा एकुण 6 हजार 850 जणांविरुद्ध फौजदारी प्रक्रियेनुसार कारवाई करण्यात आली आहे.