प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरढोणच्या एका युवकाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश आलंय. गेल्या पाच दिवसापासून पंचगंगा नदी पात्रात हा तरुण बेपत्ता होता. धक्कादायक बाब म्हणजे मगरींचा वापर परिसरात हा तरुण अडकून पडला होता. गेल्या पाच दिवसांपासून त्याचा शोध सुरु होता. अखेर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी तरुणाला शोधून काढलं आणि जीवनदान दिलं. या सगळ्या प्रकारामुळे तरुणाला जबर धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य मोहन बंडगर असं (19 वर्षे) या तरुणाचं नाव असून गेल्या पाच दिवसापासून मगरीचा वावर असणाऱ्या परिसरात आणि गर्द झाडे झुडपाच्या मध्ये तो अडकून बसला होता. तब्बल पाच दिवस रेस्क्यू फोर्सचे जवान आणि नागरिकांनी शोध मोहीम राबवली होता. अखेर पंचगंगा नदी पात्राजवळील जय हिंद पाणीपुरवठ्याच्या जॅकवेल शेजारील खड्ड्यात हा तरुण असल्याचे दिसून आलं. आदित्य गेल्या पाच दिवसांपासून बचावासाठी आकांताने ओरडत होता. पण जॅकवेलच्या मोटारीच्या आवाजाने त्याचा आवाज कोणालाही ऐकू येत नव्हता. पण अखेर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी त्याचा शोध घेत मृत्यूच्या दाढेतून त्याला बाहेर काढण्यात यश मिळवलं आहे.


शिरोळ तालुक्याच्या शिरढोण येथील आदित्य बंडगर हा युवक पंचगंगा नदी पात्रात पोहायला गेला होता. मात्र नदीत सुर मारताच  पुढे काय झाले त्याला समजले नाही. आदित्य पाण्याच्या प्रवाहात नदीपात्रात काठाकडे येण्याच्या प्रयत्नात गाळामध्ये आणि केंदाळामध्ये अडकून पडला. तब्बल 25 फूट खोल अशा या भागात तो अडकून पडला होता. नदीत मगरींचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने घरच्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर गावात ही माहिती कळताच ग्रामस्थांनी आदित्यला शोधण्यासाठी तहसील कार्यालयातून बोट आणली. तसेच व्हाईट आर्मी या बचाव पथकालाही याबाबत कळण्यात आलं. त्यानंतर सोमवारपासून शोधमोहीम सुरू करण्यात आली. मंगळवार, बुधवार, गुरुवार असे तीन दिवस शोधमोहीम सुरू होती. मात्र आदित्यचा काही थांगपत्ता लागत नव्हता. नदीतील मगरी, मोठे मासे यामुळे लोकांनी काही बरेवाईट झाल्याचे तर्कवितर्क सुरू केले होते.


तिसऱ्या दिवशी ड्रोनचाही वापर करण्यात आला मात्र आदित्यचा सापडला नाही. त्यामुळे गुरुवारी आदित्य बुडाल्याचा अंदाज बाजून शोधमोहिम थांबवण्यात आली. मात्र शेवटी शुक्रवारी व्हाईट आर्मीच्या पथकाने पुन्हा नदीकाठच्या परिसरात शोध मोहिम सुरु केली. त्याचवेळी जॅकवेलजवळच्या खड्ड्यातून वाचवा वाचवा असा आवाज येऊ लागला. बचाव पथकाने लगेच तिकडे धाव घेऊन दोरीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढलं.
 
पाच दिवस चिखलामध्ये अडकून पडलेल्या आदित्यचा जीव भूकेने व्याकूळ झाला होता. एक वेळ अशीही आली जेव्हा त्याने खायला काहीच नसल्याने चिखल खाऊन स्वतःची भूक भागविण्याचा प्रयत्न केला. बचाव पथकाने शेवटाच प्रयत्न करुन आदित्यला जीवनाद दिलं आहे.