प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : दिवाळीत चायनीज वस्तू वापरु नका, असं म्हटलं जातं... मग दिवाळीत वापरायचं काय? या प्रश्नाचं उत्तर दिलंय कोल्हापूरच्या एका उद्योजिकेनं...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपावलीसाठी सज्ज झालेल्या भारतीय बनावटीच्या दिव्यांच्या माळा या उद्योजिकेकडे तुम्हाला पाहायला मिळतील.... दिवाळीत चायनीजचे लाईट वापरु नका, असं सांगणारे बरेच जण असतात... पण त्याला पर्याय म्हणून काय वापरायचं? त्याचीच लगबग कोल्हापुरात सुरू आहे. कोल्हापुरातल्या 63 वर्षांच्या उद्योजिका कुमुदनी डफळे यांचा गेल्या 35 वर्षांपासून लायटींग तयार करण्याचा व्यवसाय आहे. बाजारात उपलब्ध होणारे चायनिज लायटिंगच्या तोडीस तोड आणि टिकायला त्याहीपेक्षा मजबूत असणाऱ्या एलईडी लायटींगच्या माळा तयार करण्याचा त्यांचा उद्योग आहे. देशातंर्गत बाजारपेठेबरोबरच विदेशातही डफळे यांच्या लायटिंगला मागणी आहे.


सुरुवातीला लायटिंगच्या माळा या बल्बच्या तयार होत होत्या. पण आता एलईडी बल्बचा वापर करुन टिकाऊ आणि आकर्षक माळा तयार केल्या जातात. डफळे यांनी तयार केलेल्या या लायटींगच्या माळा 'कोल्हापुरी लायटिंग' नावानं ओळखल्या जातात. मल्टी कलर, सिंगल कलर, ट्रीपल कलरमध्ये या लायटींगच्या माळा सध्या डफळे यांच्याकडं उपलब्ध आहेत. दिवाळीमध्ये डफळे यांच्या लायटींगला मोठी मागणी आहे. समाजशास्त्रात एमए केलेल्या कुमुदनी डफळे यांनी चायनीज लायटींगला कोल्हापुरी लायटींगचा पर्याय उपलब्ध करुन दिलाय. त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय... त्यांच्या सुनाही या कामात त्यांची मदत करतात.
 
कुमुदनी डफळे यांनी सुरु केलेल्या या व्यवसायामुळं कोल्हापूर शहरातल्या जवाहरनगर, सुभाषनगर, गंजी माळ, फुलेवाडी  परिसरातल्या अनेक महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध झालाय. डफळे यांनी तयार केलेल्या लाईट माळा रोज हजारोंच्या संख्येने पार्सलद्वारे ठिकठिकाणी रवाना होतायत. चायनीज माळा घेऊन चीनला फायदा करुन देण्यापेक्षा मराठमोळ्या उद्योजिकेनं तयार केलेल्या माळा घेतल्या तर दिवाळी आणखी प्रकाशमान होईल...