कोकण रेल्वे पुढील 24 तासांसाठी ठप्प
पुढचे 24 तास कोकण रेल्वेही बंद असणार आहे.
प्रणव पोळेकर, झी मीडिया, मुंबई : मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, नाशिक रत्नागिरी, पालघर आदी भागात धोधो पाऊस सुरू असल्याने सेंट्रल रेल्वेने पुढील 24 तास सर्व गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढचे 24 तास कोकण रेल्वेही बंद असणार आहे. या मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर विविध स्थानकात थांबवून ठेवण्यात आलेल्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे शेकडो प्रवासी विविध स्थानकात अडकून पडले आहेत.
मध्य रेल्वे कोलमडली
नेहमीप्रमाणे मध्य रेल्वे पावसामुळे कोलमडली आहे. ठाणे ते कल्याण एवढीच रेल्वे वाहतूक सुरू आहे. ठाणे ते सीएसएमटी आणि कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा अशी वाहतूक बंद आहे. हार्बर मार्गावरची वाहतूक बंद आहे. नाशिकच्या दिशेनंही इगतपुरीजवळ प्रचंड पाणी साठल्यानं रेल्वे ट्रेन रद्द झाल्या आहेत.