कोपर्डीच्या निर्भयाला न्याय कधी? साडेतीन वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत
नववीत शिकणाऱ्या मुलीवर तीन नराधमांनी केला होता अत्याचार.
लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : कोपर्डीत नववीत शिकणाऱ्या मुलीवर १३ जुलै २०१६ रोजी त्यांच्याच गावातल्या तीन नराधमांनी अत्याचार केला. त्यानंतर तिची निघृण हत्या करण्यात आली. त्यावेळी कोपर्डीच्या निर्भयासाठी महाराष्ट्रात मराठा समाजाचे लाखा लाखाचे मोर्चे निघाले. मोर्चामुळे दबावात आलेल्या तत्कालीन सरकारनं आरोपींना एका वर्षात शिक्षा देऊ, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असं सांगितलं.
फास्ट ट्रॅक कोर्टात खटला उभा राहिला. सुनावण्याही जलद झाल्या. दीड वर्षात २९ नोव्हेंबर २०१७ ला तिघाही आरोपींना फाशीची शिक्षा झाली. निर्भयाच्या कुटुंबियांना एका क्षणी वाटलं न्याय मिळाला. पण ही त्या संघर्षाची सुरुवात होती. आता खटला मुंबई हाय़कोर्टात आहे. साडेतीन वर्षानंतरही निर्भयाचे आईवडील न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
हैदराबादचं एन्काऊंटर झाल्यानंतर कोपर्डीच्या त्या माऊलीनं हैदराबाद पोलिसांचं कौतुक केलं. निर्भयाच्या आरोपींनाही कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी त्या करत आहेत.
मुंबई हायकोर्टाचा निकाल येईल, तिथून प्रकरण सुप्रीम कोर्टात जाईल, तिथल्या निकालानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल होईल. त्यानंतर राष्ट्रपतींकडं दयेची याचिका दाखल होईल. यात सगळ्यात किती दिवस जातील हे माहिती नाही. तोपर्यंत गावोगावी रस्तोरस्ती लोकीबाळींवर अत्याचार होतच राहतील. उशीरा मिळालेल्या न्यायाला अर्थ तरी उरेल का असा सवाल विचारला जातो आहे.