कोपर्डी निर्भया प्रकरण, दोषींच्या शिक्षेकडे सगळ्यांचे लक्ष
कोपर्डीतल्या निर्भयाच्या मारेक-यांना काय शिक्षा होणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मंगळवारी दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. दोषींना फाशीच दिली जावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होतेय.....
अरुण मेहेत्रें/निखील चौकर, झी मीडिया, अहमदनगर : कोपर्डीतल्या निर्भयाच्या मारेक-यांना काय शिक्षा होणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मंगळवारी दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. दोषींना फाशीच दिली जावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होतेय.....
अहमदनगर जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी त्यांना दोषी ठरवलंय. त्यांच्यावर पीडितेविरुद्ध गुन्ह्याचा कट रचणे, तिच्यावर बलात्कार करणे, अत्याचार करताना तिला जखमी करणे, गुन्हा करण्यासाठी परस्परांना प्रोत्साहित करणे, पिडीतेची छेड काढणे, तिचा निर्घृण खून करणे यांसह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ठेवण्यात आलेले सर्व आरोप सिद्ध झाले आहेत.
पोलिसांनी हस्तगत केलेल्या कपड्यांवरील रक्ताचे नमुने तसेच साक्षीदारांची साक्ष या खटल्यामध्ये आरोपींना दोषी ठरवण्यात महत्वाचे ठरलेत. आरोपींवर सिद्ध झालेल्या गुन्ह्यांमध्ये दोषींना जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. २१ नोव्हेंबरला त्याबाबतच्या युक्तीवादानंतर दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. न्यायालयाच्या निकालावर पिडीतेच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलंय.
कोपर्डी गावातील नववीत शिकणा-या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना 13 जुलै 2016 रोजी घडली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रातील सामाजिक- राजकीय वातावरण ढवळून निघाल होतं. देशभरात निघालेले मराठा मूक मोर्चे मुक मोर्चे त्याचाच भाग होते. निकालाच्या दिवशी न्यायालय परिसरात मोठी गर्दी होती. प्रकरण अतिशय संवेदनशील असल्यानं न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
आरोपींना सुनावणी सुरु होण्याच्या 2 तास आधीच न्यायालयात आणलं गेलं होतं. न्यालयात हजर केलं असता त्यांचे चेहरे निराकार होते. त्याचवेळी निकालासाठी म्हणून न्यायालयात आलेल्या पिडितेच्या कुटंबियांचे अश्रू थांबत नव्हते. घटना घडल्यानंतर दीड वर्षाच्या आत हा खटला निकाली निघालाय. आता प्रतिक्षा आहे ती शिक्षेबाबतच्या सुनावणीची.