कोरेगाव-भीमा दंगलीतील साक्षीदार तरुणीचा संशयास्पद मृत्यू
दोन दिवसांपासून पूजा बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर गावातल्याच विहिरीत तिचा मृतहेद सापडला
पुणे : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातली साक्षीदार असलेली अकारावीतली विद्यार्थिनी पूजा सकटचा विहिरीत बुडून संशयास्पद मृत्यू झालाय. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. नऊ आरोपींपैकी विजय वेदपाठक आणि त्याच्या मुलाला अटक करण्यात आलीय. त्यांना पुणे कोर्टात हजर केलं असता त्यांना ७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
शिक्रापूरजवळच्या गावातल्या एका विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. दोन दिवसांपासून पूजा बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर गावातल्याच विहिरीत तिचा मृतहेद सापडला.
पुजाचा बुडून मृत्यू झाल्याचं कारण शवविच्छेदन पोस्टमार्टम अहवालात नमूद करण्यात आलंय. मात्र कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर या घटनेबाबत शिक्रापूर पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय. तर या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलीय.