अमरावती: काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील कोव्हिड सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच आता राज्यात आणखी एक संतापजनक प्रकार घडला आहे. अमरावतीमध्ये एका लॅब टेक्निशियनने कोरोना चाचणीसाठी आलेल्या २४ वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेऊन तिचा विनयभंग केला. या घटनेमुळे अमरावतीमध्ये मोठी खळबळ उडाली असून राज्यभरात याचे पडसाद उमटत आहेत. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी आरोपी लॅब कर्मचाऱ्याला अटक करुन बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बडनेरा मार्गावरील एका मोठ्या व्यापारी प्रतिष्ठानमध्ये काम करणारा एक कर्मचारी २४ जुलै रोजी करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. यामुळे त्याच्या संपर्कातील सर्वांनीच कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. पीडीत तरुणी तिथेच काम करत होती. 

या सर्व कर्मचाऱ्यांना बडनेरातील मनपाच्या मोदी हॉस्पिटलमध्ये कोव्हिड चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. संपर्कातील २० जणांचे स्वॅब २८ जुलैला ट्रामा केअर टेस्टिंग लॅबमध्ये घेण्यात आले. मात्र स्वॅब घेणाऱ्या आरोपी अल्पेश देशमुखने संबंधित मुलीला परत बोलावून तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, तुम्हाला युरिनल तपासणी करावी लागेल, असे सांगितले. यानंतर अल्पेश देशमुखने तिचा स्वॅब घेऊन कोरोना टेस्ट नेगेटिव्ह असल्याचे सांगितले.
मुळात कोविड चाचणीसाठी नाक, घसा या दोनच ठिकाणचे स्वॅब घेतले जातात. याची शंका आल्यानंतर पीडीत तरुणीने ही गोष्ट भावाला सांगितली. त्याने डॉक्टरांकडे विचारणा केल्यानंतर कोरोना टेस्टसाठी गुप्तांगातून कोणत्याही प्रकारचे स्वॅब घेतले जात नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी या अल्पेश देशमुखला बलात्कार, आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली.