पुणे : लडाखमध्ये मराठी माणसाने झेंडा फडकावला आहे. पुण्याचा मराठमोळा आशिष याने लडाखमध्ये 'ला अल्ट्रा' मॅरेथॉन स्पर्धा जिंकत हा झेंडा फडकावला. लडाखमध्ये 'ला अल्ट्रा' मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येते. लडाखमध्ये आव्हानांचा डोंगर असणारी ही स्पर्धा पूर्ण करणे हे धावपटूसाठी स्वप्न असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे स्वप्न सत्यात उतरवले आहे. पुणेकर असलेल्या आशिष कासोदेकर यांनी. ही स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय ठरलेत. १७ ऑगस्टला नुब्रा खोऱ्यातल्या तीर्थ गावातून या स्पर्धेला सुरुवात झाली. साडे पाच दिवसात ५५५ किलोमीटर अंतर कापायचे होते. 


उणे १२ अंशाची कडाक्याची थंडी ते ४० अंश सेल्सियसचा उकाड्यात स्पर्धकांना धावायचं होते. १७ हजार ५०० फुट उंचीवर अतिशय विरळ ऑक्सिजन असताना हे आव्हान होते. पण हे आव्हान आशिष कासोदेकरांनी सहज पेललंय. दोन परदेशी धावपटूंसह त्यांनी सहा तास अगोदरच म्हणजे १२६ तासांत ही स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेत मानवी क्षमतेचा कस लागतो. ही स्पर्धा पूर्ण करून भारतीय पण काही कमी नाहीत हे आशिष कासोदेकरांनी दाखवून दिले.