Ladki Bahin Yojana Latest Updates: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात (Laadki Bahin Yojna) मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी जाहीर केलं आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"लाडकी बहिण योजनेच्या मूळ जीआरमध्ये आम्ही कोणतेही बदल करत नाही. स्थानिक प्रधानाकडून तक्रारी आल्या आहेत. ज्यांच्याकडे चारचाकी वाहनं आहेत, त्यांची पडताळणी होणार आहे. सरसकट पडताळणी होणार नाही. ज्यांच्या बाबतीत तक्रारी आल्या आहेत त्यांची पडताळणी होणार आहे. काही तक्रारी आम्हाला लाभार्थी महिलांकडून प्राप्त झाल्या आहेत," अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. 


"लाडकी बहीण योजनेसंदर्भात आम्हाला एक ते दीड महिन्यात काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आम्ही या सर्व तक्रारींची दखल घेतली असून छाननी करत आहोत. यासाठी आम्ही इन्कम टॅक्स, तसंच चारचाकीची माहिती घेण्यासाठी आरटीओ विभाग यांची मदत घेणार आहोत," असं त्या म्हणाल्या आहेत. 


"ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी होणार. काही महिला लग्न झाल्यानंतर राज्याबाहेर गेल्या आहेत त्यांना लाभ मिळणार नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. काही महिलांनी दोन वेळा अर्ज दाखल केले आहेत असंही त्यांनी सांगितलं. पालकमंत्रीपदाबाबत आमचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतली असं त्या म्हणाल्या आहेत. 


लाडकी बहीण योजनेबाबत 5 प्रकारच्या तक्रारी महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त 



अदिती तटकरे यांनी वेगवेगळ्या पद्दतीने पडताळणी होणार असल्याचं म्हटलं आहे. काही तक्रारी स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झाल्या आहेत तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून योजनेसाठी आता पात्र नसल्याची माहिती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मूळ जीआरमध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचे देखील अदिती तटकरे यांनी सांगितलं. 



1) ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तरी योजनेचा फायदा घेत आहे अशा अर्जांची होणार पडताळणी 


2) चारचाकी वाहन असलेल्या अर्जांची होणार पडताळणी 


3) एकच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जांची होणार पडताळणी 


4) लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जांची होणार पडताळणी 


5) आधार कार्डवर आणि कागद पत्रावर नावांमध्ये तफावत असलेल्या अर्जाची पडताळणी होणार