किरण ताजणे, पुणे : कुणाला कधी, कशाचा आणि कसा आनंद होईल, आणि तो ते कसा व्यक्त करतील, याचा काहीच नेम नसतो. असाच एक आनंद सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालतोय. जिम सुरू झाल्याचा आनंद या महिलेला इतका झाला की ही महिला थेट साडीवरच जिममध्ये पोहोचली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा संसर्गामुळे तब्बल दीड वर्षांनी जिम सुरू झाली आणि डॉ. शर्वरी इनामदार यांच्या अंगात असं वारं भरलं. छानपैकी काठ पदराची भरजरी साडी नेसून त्यांनी हे झिंगाट वर्कआऊट अगदी लीलया केलं.. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान गाजतोय...


डॉ. शर्वरी इनामदार या नियमित जिमला जाणा-या... मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळं जिम बंद पडल्या आणि त्यांचा व्यायाम थांबला.. त्यामुळंच तब्बल दीड वर्षांनी जेव्हा पुन्हा जिम सुरू झाल्या तेव्हा सेलिब्रेशन तो बनता है बॉस...



डॉ. शर्वरी इनामदार आयुर्वेदातल्या एमडी आहेत. त्या स्वतःचं क्लिनिकही चालवतात. पण पॉवर लिफ्टिंग खेळाडू हीच त्यांची खरी ओळख. पॉवर लिफ्टिंगपटू शर्वरी यांनी चारवेळा स्ट्राँग वुमन होण्याचा मान पटकावलाय. 


20 व्या वर्षीच त्यांचं लग्न झालं. त्यांचा फिटनेस आणि फिजिक पाहून त्यांना दोन मुलं आहेत, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. साडीमध्ये वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोलही केलं... पण अशा ट्रोलर्सची त्यांना अजिबातच फिकीर नाही.


संसाराचा रहाटगाडा चालवताना अनेकदा महिला आपल्या आवडीनिवडींकडे दुर्लक्ष करतात. मात्र योग्य व्यायाम केला आणि आहार-निद्रा यांचा मेळ घातला तर तारुण्य आणि जोम चिरकाळ टिकवता येतो, हेच या मराठमोळ्या स्ट्राँग वुमननं सिद्ध केलंय.