पंढरपूर : महिला सरपंचाकडून गावकऱ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. शौचालयासाठी घेतलेल्या अनुदानाबाबत तक्रार केल्यानं सरपंचांनी मुजोरी दाखवत ही मारहाण केली. शौचालय अनुदानाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सरपंचानी ग्रामस्थाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मारहाणीचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माढा तालुक्यातील तांदूळवाडी गावातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सरपंच अनिता नामदेव भोसले यानी स्वच्छ भारत अभियान योजनेतून शौचालयासाठी अनुदान घेतलं. खरंतर सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही. गावातील ग्रामस्थ सुरेश गवळी यानी काही दिवसापूर्वी याबाबत सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. 


यामुळे आपलं सरपंच पद धोक्यात येऊ शकते याची जाणीव सरपंच भोसले यांना झाली. हा राग धरून त्यानी गावातील चौकातच तक्रारदार सुरेश गवळी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरपंच अनिता भोसले विरोधात कुर्डूवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.