शशिकांत पाटील, झी २४ तास, लातूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येणाऱ्या कारवाईत अनेकदा पैशांची मागणी केली गेल्याच्या घटना पाहायला मिळतात. मात्र लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात एका आरोग्य अधिकाऱ्याला चक्क बियर आणि व्हिस्कीची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूर तालुक्यातील निवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा ४३ वर्षीय वैद्यकीय अधिकारी डॉ़ भालचंद्र हरिहर चाकूरकर असे बिअर आणि दारूची लाच स्वीकारणाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार आरोग्य कर्मचाऱ्याच्या स्वयंमुल्यांकनाच्या अहवालात बदल करण्याच्या कामासाठी लाच म्हणून बियर आणि व्हिस्कीच्या बॉटल स्वीकारताना लाचचुतपत प्रतिबंधक विभागाने रात्रीच्या वेळी त्यांना ताब्यात घेतले. लातूर तालुक्यातील निवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तक्रारदार आरोग्य कर्मचारी कार्यरत आहे़. 


संबंधित कर्मचाऱ्याच्या २०१८-१९ मधील स्वयंमुल्यांकन (एसीआर) अहवालावर देण्यात आलेला ‘बी प्लस’ शेरा रद्द करून तो ‘ए प्लस’ करण्यात यावा. या कामासाठी डॉ़ भालचंद्र चाकूरकर याने दारूची पार्टी देण्याची मागणी केली होती. याबाबत संबंधित त्रस्त झालेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. 


तक्रारीच्या पडताळणीनंतर औसा रोडवरील एका ढाब्यावर सापळा रचला. यावेळी डॉ. चाकूरकर याने वॉईनशॉप मधून ९८० रुपये किमतीची बीयर आणि व्हिस्कीची बाटली तक्रारदाराला घेऊन येण्यास सांगितली. या बाटल्या पंचासमक्ष स्वीकारतानाच त्यांना ताब्यात घेण्यात आलं. याप्रकरणी लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दारू आणि बियरच्या या अनोख्या लाचेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.