लातूर : लातूर-उस्मानाबाद- बीड विधान परिषद निवडणूक येत्या २१ मे रोजी होत आहे. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती हे विधान परिषदेचे मतदार असतात. त्यामुळे भाजप उमेदवार सुरेश धस यांना लातूरमधून कुठलाही दगा फटका होऊ नये यासाठी भाजपचे जवळ्पास ३८ नगरसेवक अज्ञातस्थळी सहलीला गेले आहेत. याविषयी माध्यमांची दिशाभूल करीत ही सहल नसून पुणे येथे  प्रशिक्षण शिबिरासाठी जात असल्याची बतावणी स्थानिक भाजप नेत्यांनी केली. 


मुळात हे सर्व नगरसेवक गोवा येथे सहलीला गेल्याचे बोलले जात आहे.  विधान परिषद निवडणुकीत घोडे बाजार तेजीत असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवक बळी पडू नये यासाठी जवळपास ३८ नगरसेवक सक्तीच्या सहलीवर गेल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसने अशोक जगदाळे यांना पुरस्कृत केलं आहे. लातूरमध्ये काँग्रेसची ताकद असल्यामुळे कुठलीही 'रिस्क' भाजप घेणार नसल्यामुळे नगरसेवकांची ही 'टूर-टूर' गोव्याला गेल्याचेही बोलले जात आहे.