पावसाअभावी गणेश विसर्जन न करण्याची लातुरकरांवर वेळ
पावसाअभावी गणपतींचे विसर्जन न करण्याची वेळ लातूर शहरावर आलेली आहे.
लातूर : पावसाअभावी गणपतींचे विसर्जन न करण्याची वेळ लातूर शहरावर आलेली आहे. त्यामुळे विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणूक काढली पण गणपती हे प्रशासनाकडे दान केले. तर अनेक घरगुती गणपतीचेही दान नागरिकांनी प्रशासनाकडे केलं आहे. पावसाअभावी गणेश विसर्जनापासून मुकावे लागणारे लातूर हे देशातीलच नव्हे तर जगातील पहिले शहर ठरले आहे.
लातूर शहरात यावर्षी पावसाअभावी विहिरी, तलाव, बारव आणि नद्या या कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळ आणि घरगुती गणपतीचे विसर्जन हे सार्वजनिक विहीर, तलाव, बारव किंवा नदीत झालेच नाहीत. लातूर शहरातील नागरिकांनी आपल्या घरी दहा दिवस स्थापन केलेल्या गणपतीचे घरीच बादलीत, टब किंवा मोठ्या भांड्यात विसर्जन केले.
लातूर शहरातील सिद्धेश्वर मंदिर येथील बारव, औसा रोड वरील विहीर, अंबाजोगाई रोड वरील विहीर, महापूर जवळील कोरडी पडलेली मांजरा नदी, कव्हा येथील तळं अशा विविध ठिकाणी गणपती संकलन केंद्र महापालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी गणपती संकलन केंद्र उभारली होती. तर घरगुती गणपतीसाठीही अनेक ठिकाणी संकलन केंद्र उभारली होती. ज्यात हजारोंच्या संख्येने घरगुती गणपती नागरिकांनी दान केली आहेत.
नागरिकांनी गणपती दान करताना गणेशाचे विसर्जन न केल्याचे दुःख असले तरी पर्यावरणाचे रक्षण करून उपलब्ध पाण्यात विसर्जन न करता ते पाणी पिण्यासाठी वाचवल्याचा करीत असल्याचा आनंदही अनेकांच्या चेहऱ्यावर झळकत होता. एकूणच असा आगळावेगळा विसर्जन सोहळा भविष्यात कधीच साजरा करण्याची वेळ लातूरकरांवर येऊ नये अशी ही प्रार्थना लातूर शहरातील नागरिक करीत होते.
ज्या नागरिकांनी यावर्षी इको फ्रेंडली गणपती बसविले होते त्यांचे गणपती हे लवकर पाण्यात विरघळले. पण ज्यांचे गणपती प्लास्टर ऑफ पॅरिसचे आहेत असे गणपती असणाऱ्या नागरिकांची मात्र मोठी पंचायत झाली. काही जणांनी तर बाजारातील खाण्याचा सोडा पाण्यात टाकून त्यात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेले गणपती पाण्यात बुडवून ठेवले. असे गणपती जवळपास ४८ तासात विरघळू शकतात.
अनेक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुका काढल्या. मात्र मूर्ती विसर्जित न करता गणपती बाप्पाची मूर्ती प्रशासनाला किंवा मूर्तीकारांना दान करावी लागली किंवा पुढील वर्षासाठी अनेक मंडळांनी मूर्ती जतन करण्याचे ठरविले आहे. एकूणच पावसाचा फटका हा गणपती बाप्पाला बसला असून लातूरच्या गणेश विसर्जनावर दुष्काळाचे सावट दिसून आले.