वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर : सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय. त्यामुळे हृदय रोगाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसतंय. परिणामी हार्ट अटॅकचं (Heart Attack) प्रमाणी वाढलंय. मात्र आता हृदयविकाराच्या झटक्याचा धोका काही प्रमाणात टाळता येणार असल्याचा दावा करण्यात आलाय. लातूरच्या डॉ आशिष गुळवे यांनी 'डिजिटल कार्डियोमीटर (Digital Cardiometer) हे डिवाईस विकसित केलंय. त्याद्वारे रक्ताची चाचणी केल्यानंतर हृदयविकाराचा झटका येणार आहे की नाही हे घरबसल्या समजू शकणार आहे असा दावा डॉ गुळवेंनी केलाय.. आता केंद्र सरकारने ही  डिजिटल कार्डियोमीटर' ला पेटंट प्रदान केलंय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात वर्षाला ह्दयविकाराने लाखो रुग्णांचा मृत्यू होतो. कुठल्याही गंभीर आजारांपेक्षाही संख्या अधिक असताना वैद्यकीय क्षेत्रात त्यावर मात करणारे संशोधन झालं नव्हतं. मात्र लातूरच्या डॉ आशिष गुळवे यांनी हीच बाब संशोधनाच्या केंद्रस्थानी ठेवून त्यातील नवे संशोधन विकसीत केलं आहे. ह्दयविकार येण्यापूर्वी तसे संकेत मिळतात. परिणामी हृदयविकाराचा धोका टाळता येतो. ईसीजी, इन्जोग्रॉफी या महागड्या आणि वेळेखाऊ तपासण्या होवून निदान लागेपर्यंत खूप उशीर होतो. त्यात रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. मात्र विकसीत केलेल्या नवीन संशोधनात ह्दयरोगाचे संकेत मिळताच रक्ताच्या तपासण्या केल्यास तात्काळ धोका टाळता येणार आहे.


देशात ह्दयविकाराने वर्षाला लाखो रुग्णांना जीव गमवावा लागतो. मात्र  डिजिटल कार्डियोमीटर च्या माध्यमातून हे मृत्यू रोखण्यात मदत होणार असल्याचा दावा केला गेलाय. याचा देशभरातील लाखो रुग्णांचा याचा फायदाच होणार आहे.


हार्ट अटॅकची लक्षणं
हार्ट अटॅक येणारपूर्वी  थकवा येणे, झोप कमी लागणे, थकवा जाणवणे, सतत चिंता सतावणे, हृदयाचे ठोके वाढणे, अशक्तपणा किंवा हात सुन्न होणे, विसरभोळेपणा सुरु होणे, दिसायला कमी लागणे, भूक न लागणे, हात पायांना मुंग्या येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणं दिसू लागतात. ही लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.


अशी घ्या काळजी
सध्याच्या धकाधकीच्या काळात निरोगी आहाराकडे लक्ष राहत नाही. आणि हेच हार्ट अटॅकचे कारण ठरू शकते. याशिवाय धुम्रपान आणि मद्यपानाची सवय असेल तर वेळीच ही सवय सोडून द्या.