धीरज देशमुख यांना रूग्णालयातून डिस्चार्ज, आजपासून प्रचारात
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून धीरज देशमुख निवडणूक रिंगणात उभे आहेत.
शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे धाकटे सुपुत्र धीरज देशमुख हे विधानसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक रिंगणात उभे आहेत. दोन दिवसांपूर्वी व्हायरल इन्फेक्शनमुळे त्यांना लातूरच्या सदासुख हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. व्हायरलमुळे त्यांना ताप ही आला होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून धीरज देशमुख यांच्या प्रचाराची धुरा काँग्रेस कार्यकर्त्यांवरच होती.
मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी त्यांची रुग्णालयातूनडिस्चार्ज देण्यात आला असून, त्यांची प्रकृती सुधारणा होत असल्याची माहिती सदासुख हॉस्पिटलचे डॉ.चेतन सारडा यांनी दिली आहे.
लातूर शहरात पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे पाणी साठवले जाते. त्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होऊन डेंगू, चिकन गुणिया, मलेरियाची साथ सुरू आहे. त्यामुळे डासांपासून सर्वांनीच बचाव करुन या साथीपासून बचाव करण्याचे आवाहन डॉ. चेतन सारडा यांनी केले आहे.
दरम्यान काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळपासून धीरज विलासराव देशमुख हे पुन्हा एकदा लातूर ग्रामीण मतदारसंघातून आपल्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत.