कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKnath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadavis) यांच्या हस्ते 31 मे रोजी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यात पाणी सोडून पहिली चाचणी करण्यात आली. गेल्या पाच दशकांपेक्षा अधिक काळ राजकीय संघर्षात अडकलेला निळवंडे धरण प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. 53 वर्षांनंतर प्रतीक्षेनंतर अखेरीस निळवंडे धरणाचे (Nilwande Dam) काम पूर्ण झाले आणि आता कालव्यांची कामे सुद्धा पूर्ण झाली आहेत. यामुळे आता दुष्काळी भागातील पाण्याची समस्या संपण्याची चिन्हे आहेत. मात्र आता निळवंडेच्या डाव्या कालव्याला गळती (Leakage) लागल्याचे समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या या प्रकल्पाला दोनच दिवसात गळती लागल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. उद्घाटनानंतर निळवंडे धरणाच्या कालव्यातून चाचणीसाठी क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते. मात्र आता या पाण्याची गळती होत असल्याचे समोर आले आहे. गळती झालेले पाणी आजूबाजूच्या शेतात गेल्याने हा सर्व प्रकार समोर आला आहे. निळवंडेच्या डाव्या कालव्याचे पाणी गळती होऊ बहिरवडी गावात पोहोचले आहे. त्यामुळे आता या कामाबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.


निळवंडे प्रकल्प कसा झाला?


ऊर्ध्व प्रवरा प्रकल्पाला निळवंडे धरण या नावाने देखील ओळखले जाते. 1970 मध्ये प्रवरा नदीवर म्हाळादेवी येथे धरण बांधण्यास मान्यता मिळाली होती. 1977 मध्ये त्यावेळच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते धरणाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र  शेतकऱ्यांच्या विरोधामुळे धरणाची जागा दोन वेळ बदलण्यात आली आणि शेवटी निळवंडे येथे प्रकल्प उभारण्याचे निश्चित झाले. त्यानंतर मे 1992 मध्ये धरणाच्या कामाचे भूमिपूजन होऊन मार्च 1996 मध्ये प्रत्यक्ष धरण बांधकामास सुरवात झाली. अनेक अडचणींचा सामना करत 2012- 13 मध्ये बांधकाम पूर्ण झाले. मात्र कालव्यांचे काम अद्याप अपूर्णच होते. त्यानंतर आता मे 2023 मध्ये कालव्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याची चाचणी पूर्ण करण्यात आली. मात्र यामध्ये देखील गळती सुरु असल्याने बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 


कसा आहे निळंवडे प्रकल्प?


निळवंडे प्रकल्पावर डावा कालवा, उजवा कालवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजना असे चार कालवे आहेत. डावा कालवा हा 85 किलोमीटरचा असून याच्या माध्यमातून संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव आणि सिन्नर मधील 113 गावांमधील पाणी प्रश्न मिटणार आहे. तर 97 किलोमीटरच्या उजव्या कालव्यातून अहमदनगर जिल्ह्यातील 69 गावांमधील 20395 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.