अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे : मोदकाच्या सारणासाठी नारळ आणायचेत... तांदळाचं पीठ एव्हाना आणून झालं असेल... सारणात घालण्यासाठी केशर आहे की नाही, ते बघायचंय... आज घरोघरी अशी सगळी लगबग सुरू आहे... कारण उद्या गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवायचाय... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुगरणीच्या कौशल्याचा कस लावणारा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक... गणेशोत्सवाच्या निमित्तानं घरोघरी उकडीच्या मोदकांचा बेत असतो... स्वयंपाकाची आणि त्यातही उकडीचे मोदक बनवण्याची आवड असणाऱ्यांसाठी पुण्यातल्या शिल्पा भिडे गेल्या अनेक वर्षांपासून मोदक बनविण्याचं प्रशिक्षण देतात... मोदकाची उकड, त्यासाठी लागणारं सारण, याबद्दल महत्त्वाच्या टिप्स त्या देतात... 


शिक्षिका असणाऱ्या शिल्पा स्वत:ही उकडीचे मोदक बनविण्यात निष्णात आहेत. गणेशोत्सवात मोदकांची ऑर्डरही त्या घेतात. मात्र, त्याहीपेक्षा जास्त समाधान त्याच प्रशिक्षण देण्यात असल्याचं त्या सांगतात... केवळ पुण्यातच नाही तर परदेशातही त्यांनी मोदकांसाठी कार्यशाळा घेतल्या आहेत... त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक महिला आणि तरुणींनी स्वत:चा मोदकांचा व्यवसायही सुरु केलाय. 


एरवी रोजच्या धावपळीत वेळ मिळत नसला तरी गणेशोत्सवाच्या तोंडावर मात्र अनेक महिला आर्वजुन उकडीच्या मोदकांचं प्रशिक्षण घेतात... सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिल्पा भिडे यांच्याकडून बऱ्याच पुरुषांनीही मोदक तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलंय. 


उकडीच्या मोदकाची अस्सल चव आणि कौशल्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचं काम शिल्पा भिडे करतायत... एव्हढचं नाही तर त्यांच्या या कार्यशाळेमुळे दरवर्षी मोदक बनविणाऱ्या अनेक उद्योजिकाही तयार होतायत.