Mumbai Local train :  पश्चिम रेल्वेमार्गावर विचित्र घटना घडली आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकात स्टेशन सोडून विरार लोकल 4 डबे पुढे थांबली. यामुळे प्रवाशांना थेट रेल्वे ट्रॅकवर उतरावे लागले. या प्रकारामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मोटरमनच्या हलर्गजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप रेल्वे प्रवाशांनी केला आहे. 


काय घडलं नेमकं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नालासोपारा रेल्वे स्थानकात चार वाजून 28 मिनिटांची एसी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर आली होती. मात्र, यावेळी येथे आलेली एसी लोकल येलो पट्टीच्या आत थांबवण्या ऐवजी चार डबे प्लॅटफॉर्मच्या पुढे जाऊन ट्रेन थांबली होती. त्यामुळे नालासोपाराला उतरणारे प्रवाशी जीव धोक्यात घालून ट्रॅकवर उतरून घरी परतले तर काही प्रवासी ट्रॅकवर न उतरता विरारला पोहोचले व पुन्हा दुसऱ्या ट्रेनने नालासोपारा असा परतीचा प्रवास केला. मोटर मनच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाल्याचे बोलले जात असून प्रवासांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.


पोलिसांच्या मदतीने विरार AC लोकलचे दरवाजे केले बंद 


मुंबईत पश्चिम रेल्वेवरच्या एसी लोकल ट्रेनमध्ये गर्दी जास्त असल्याने लोकलचा दरवाजाच बंद होत नव्हता. शेवटी पोलिसांच्या मदतीनं दरवाजे बंद करावे लागले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एसी लोकल मध्य प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. त्यामुळे दरवाजे बंद होत नव्हते. काही प्रवाशांना खाली उतरवून लोकलचे दरवाजे बंद करण्यात आले.


विरार-चर्चगेट एसी लोकलच्या  प्रवाशांना पाऊस पडत असल्याचा अनुभव 


जून महिन्यात विरार-चर्चगेट एसी लोकलमधल्या एका डब्यात सकाळी सव्वासातच्यादरम्यान गळतीमुळे पाण्याची धार लागली. विरारहून लोकल निघाल्यावर थेंब थेंब गळणारे पाणी बोरिवलीपर्यंत संततधारेच्या रूपात बरसू लागलं. पाऊस नसताना लोकलमध्ये पाणी साचू लागल्याने प्रवासी हैराण झाले. कृष्णा दरगर या प्रवाशाने हा व्हिडीओ चित्रीत करून पश्चिम रेल्वे व्यवस्थापकांना टॅग करत प्रसारित केला. त्यानंतर पश्चिम रेल्वेने व्हिडीओची तपासणी करत  ही लोकल अंधेरी स्थानकात दाखल होताच  छताची पाहणी केली. एसी कम्प्रेसरमधून पाण्याची गळती होत असल्याचं समोर आलं. तातडीने याची दुरुस्त करत सफाई कर्मचा-याकडून डब्याची स्वच्छता करून घेण्यात आली. या सगळ्या प्रकारामुळे प्रवाशांचा मात्र खोळंबा झाला.