लातूर : लातूर बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरू झालीय. प्रशासनानं १००४ मतांची मोजणी करण्यासाठी पाच टेबलांची व्यवस्था केली आहे. सुरवातीच्या तासाभरातच निकाल बाहेर येण्याची शक्यता आहे. भाजपामधून राष्ट्रवादीमध्ये आलेले रमेश कराड यांना राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवारी दिली होती. परंतु ऐनवेळी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली होती. त्यानंतर राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा देत भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांच्या समोर आव्हान निर्माण केलं आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं तातडीनं मतमोजणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगानं मंगळवारी मतमोजणी करण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत दाखल केलेल्या सर्व याचिका फेटाळून लावत तात्काळ मतमोजणी करण्याचे आदेश न्यायालयानं दिले. बीड नगर पालिकेतल्या काकू नाना आघाडीच्या अपात्र नगरसेवकांनी आपले मतदान स्वतंत्र लिफाफ्यात न ठेवता एकत्र करुन मोजावे, अशी याचिका न्यायालयात दाखल केली होती.


तर विरोधी गटाकडून गणेश वाघमारे यांनी या नगरसेवकांचे मतदान स्वतंत्र मोजावे अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यामुळे २४ मे रोजी होणारी लातूर बीड उस्मानाबाद मतदार संघाची मतमोजणीला स्थगिती देण्यात आली होती. आता आज या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या मतदारसंघासह राज्यातील सहा जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक झाली होती. ही जागा वगळता सर्व जागांचे निकाल २४ मे रोजी जाहीर झाले होते.


अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या भावा-बहिणीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.