हेमंत चापुडे, झी 24 तास, आंबेगाव, पुणे : पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत वाढली आहे. यातून सुटका करण्यासाठी पुणे जिल्ह्यामधल्या आंबेगाव तालुक्यातल्या रांजणी गावच्या तरुणानं नामी उपाय शोधून काढला आहे. बिबट्या म्हटलं की अनेकांना घाम फुटतो, पण हाच बिबट्या आता उत्तर-पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड जुन्नर या तालुक्यांत नित्याची बाब झाली असून या भागात बिबट्याचे पाळीव प्राणी आणि मनुष्य यांच्यावर हल्ल्यांचं सत्र सुरू आहे. यावरच पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यामधल्या रांजणी गावच्या अमन भंडारी यानं चक्क तोफ बनवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमन सध्या नरसिंह विद्यालयात शिक्षण घेतोय. घरगुती टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेली मोठा आवाज करणारी ही तोफ, बिबट्याच्या दहशतीवरचा उपाय आहे. घरातले खराब झालेले पीव्हीसी पाईपचे तुकडे घेऊन या पाईपांसोबत लाईटर कॅल्शियम कार्बाइड पाणी यांच्या माध्यमातून, फटाक्यापेक्षा ही मोठा आवाज करणारी तोफ अमननं बनवली. 


अमनची नामी शक्कल

या भागात जंगलात जिरायती क्षेत्र बागायती करून ऊसाची शेती सुरू झालीय. त्यामुळे अनेकदा बिबट्या उसाच्या शेतीत रात्रीच्या वेळी पाळीव प्राणी आणि मनुष्य यांना आपलं भक्ष्य बनवताना दिसतो. परंतु, बिबट्या हा मोठ्या आवाजाला घाबरणारा प्राणी असल्यानं, अमनची ही तोफ बिबट्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल, असं वन अधिकारी विजय वेलकर यांनाही वाटतंय. 



अगदी सहज आणि अल्प खर्चात मोठा आवाज करणारी ही तोफ बनवून, बिबट्याला दूर ठेवणं यामुळे सहजशक्य होणार आहे.